
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता हर्षवर्धन राणे याने घेतलेला ठाम निर्णय चर्चेचा विषय ठरतोय. पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन हिने भारतावर केलेल्या टीकेनंतर हर्षवर्धनने तिला फटकारले. जर निर्मात्यांनी आधीचे कलाकार घेऊनच 'सनम तेरी कसम २' सिनेमा बनवण्याचे ठरवले तर त्यात काम करणार नाही, अशी भूमिका हर्षवर्धनने जाहीर केली होती. तर, हा केवळ पीआर स्टंट असून लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याची टीका मावरा होकेन हिने केली होती. त्यानंतर आता हर्षवर्धनने यावरुनही मावराला आपल्या शांत पण ठाम शैलीत चोख आणि सडेतोड उत्तर दिलं आहे.
मावरा होकेन हि पाकिस्तानी अभिनेत्री असून ती २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'सनम तेरी कसम' या चित्रपटात हर्षवर्धन राणेसोबत मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट सुरुवातीला फारसा गाजला नाही. मात्र २०२५ मध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर याला तरुण वर्गात मोठी लोकप्रियता मिळाली. या यशानंतर अलीकडेच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली. परंतु, पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही कलाकारांमधील संबंधही कमालीचे ताणले गेले.
नेमके काय घडले?
७ मे रोजी भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर टीका करताना मावराने, भारताने पाकिस्तानवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध असे म्हटले होते. त्या पोस्टमुळे चिडलेल्या हर्षवर्धनने, जर निर्मात्यांनी आधीचे कलाकार घेऊनच 'सनम तेरी कसम २' सिनेमा बनवण्याचे ठरवले असेल तर त्यात काम करणार नाही, अशी भूमिका मांडली. मी सर्व कलाकारांचा, व्यक्तींचा...अगदी मंगळावरील (ग्रह) लोकांचाही आदर करतो. पण माझ्या देशाबाबत असे अपमानास्पद शब्द अक्षम्य आहेत. माझे इन्स्टावरील फॉलोअर्स कमी झाले तरी चालेल, पण मी कोणालाही माझा अभिमान चिरडू देणार नाही. आपल्या देशासाठी उभे राहणे ही चांगली गोष्ट आहे पण दुसऱ्या देशाबद्दल द्वेष पसरवणे, अपमान करणे योग्य नाही, अशी पोस्ट त्याने केली होती.
पीआर स्टंट, कॉमनसेन्सची अपेक्षा होती; मावराची टीका
त्यावर उत्तर देताना, हा पीआर स्टंट असल्याचे आणि लक्ष वेधण्याचा प्रकार असल्याचे मावरा म्हणाली होती. तसेच, ज्याच्याकडून मी सामान्य ज्ञानाची (कॉमनसेन्स) अपेक्षा केली होती, तो 'PR स्ट्रॅटेजी' करतोय, असे तिने पोस्टमध्ये म्हटले होते.
हर्षवर्धनकडून सडेतोड प्रत्युत्तर
हा वैयक्तिक हल्ल्याचा प्रयत्न असल्यासारखा वाटतो. सुदैवाने, अशा प्रयत्नांकडे दुर्लक्ष करण्याची माझ्यात सहनशीलता आहे. परंतु, माझ्या देशाच्या प्रतिष्ठेवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याच्या बाबतीत मी अजिबात सहनशील नाही. तिच्या बोलण्यात इतका द्वेष आहे, इतक्या वैयक्तिक टिप्पण्या आहेत. मी कधीही तिचे नाव घेतले नाही. मी फक्त भाग २ मधून पायउतार होण्याचे म्हटले होते. माझ्या देशाने केलेल्या कारवाईला भ्याड म्हणणाऱ्या व्यक्तींसोबत काम न करण्याचा निर्णय घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. एक भारतीय शेतकरी त्याच्या पिकातून नको असलेले तण उपटून टाकतो त्याला तण काढणे म्हणतात, त्यासाठी शेतकऱ्याला पीआर टीमची गरज नाही, त्यालाच सामान्य ज्ञान म्हणतात, असे त्याने सुनावले.
आता सोशल मीडियावरही हर्षवर्धनची पोस्ट व्हायरल होत असून भारतामधून त्याच्या चाहत्यांनी पाठींबा दिल्याचे दिसून येत आहे. यासोबतच आता या चित्रपटाच्या मेकर्सने देखील 'राष्ट्र-प्रथम' अशी भूमिका घेतली आहे.