ॲास्करच्या शर्यतीत 'दशावतार', पहिल्या दीडशे चित्रपटात दशावतारची वर्णी

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी मोठी बातमी समोर आली असून, ‘दशावतार’ची थेट ऑस्कर म्हणजेच अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत निवड झाली आहे. जगभरातून निवडल्या गेलेल्या दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये ‘दशावतार’चा समावेश असून, या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव मराठी सिनेमा आहे.
ॲास्करच्या शर्यतीत 'दशावतार', पहिल्या दीडशे चित्रपटात दशावतारची वर्णी
ॲास्करच्या शर्यतीत 'दशावतार', पहिल्या दीडशे चित्रपटात दशावतारची वर्णी
Published on

२०२५ मध्ये बॉक्स ऑफिसपासून अमराठी प्रेक्षकांपर्यंत आपली भुरळ घालणारा मराठी चित्रपट ‘दशावतार’ आता जागतिक व्यासपीठावर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी मोठी बातमी समोर आली असून, ‘दशावतार’ची थेट ऑस्कर म्हणजेच अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत निवड झाली आहे.

२०२५ हे वर्ष ‘दशावतार’साठी विक्रमी ठरलं. दमदार कमाईसोबतच या चित्रपटाने मराठीपलीकडे जाऊन इतर भाषिक प्रेक्षकांनाही आकर्षित केलं. इतकंच नव्हे, तर मल्याळम भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. आता २०२६ हे वर्षही 'दशावतार'साठी तितकंच खास ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत मराठी सिनेसृष्टीसाठी हा क्षण किती महत्त्वाचा आहे, हे शब्दांतून व्यक्त केलं. त्यांच्या पोस्टनुसार, ऑस्करच्या Main Open Film Category - Contention List मध्ये ‘दशावतार’ची निवड झाली आहे. जगभरातून निवडल्या गेलेल्या दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये ‘दशावतार’चा समावेश असून, या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव मराठी सिनेमा आहे.

सुबोध खानोलकर यांनी आणखी एक महत्त्वाची बाब सांगितली, ती म्हणजे अकॅडमीच्या अधिकृत Screening Room मध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. यासंदर्भात निर्मात्यांना आलेल्या एका ई-मेलचा स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केला असून, त्यात ‘दशावतार’ आता अकॅडमी स्क्रीनिंग रूममध्ये लाइव्ह असल्याचं नमूद आहे.

या यशाबद्दल भावना व्यक्त करताना सुबोध लिहितात की, वर्षानुवर्षांच्या मेहनतीची, प्रामाणिकपणाची आणि मोठी स्वप्नं पाहण्याची ही पावती आहे. जिंकणं-हरणं नंतरची गोष्ट असली, तरी जागतिक सिनेमाच्या मुख्य प्रवाहात मराठी चित्रपटाची दखल घेतली जाणं हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठी सिनेमा जागतिक पातळीवर तोडीस तोड उभा राहू शकतो, हे ‘दशावतार’ने पुन्हा एकदा सिद्ध केल्याचंही त्यांनी नमूद केलं.

‘दशावतार’च्या या ऐतिहासिक वाटचालीमुळे केवळ एका चित्रपटाचं नाही, तर संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचं नाव जागतिक स्तरावर उजळलं आहे. हा प्रवास अजून सुरूवात असल्याचं सांगत, भविष्यातही सातत्याने दर्जेदार मराठी सिनेमा जगासमोर आणण्याचा निर्धार टीमने व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in