

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे. या जोडप्याने आपल्या दुसऱ्या लेकीचं नाव जाहीर करत कुटुंबाचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. चिमुकलीचं नाव 'देवी पदुकोण सिंह' असं ठेवण्यात आलं आहे. या फोटोसोबत त्यांनी, "प्रेम आणि भरभराटीने भरलेलं आयुष्य… देवी पदुकोण सिंह" असं कॅप्शन दिलं आहे. दीपिका-रणवीरच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून, चिमुकलीच्या नावाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
मुलीच्या नावावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
मुलीच्या नावावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले, "दीपवीरवरील प्रेमाने माझं मन अगदी भरून आलं आहे! तुमच्या सुंदर प्रेमाचं रूपांतर अशा गोड कुटुंबात होताना पाहणं, ही सर्वांत आनंदाची गोष्ट आहे. दुआ आणि देवी या दोघीही तुमच्यासाठी कायम सर्वांत मोठा आशीर्वाद ठरोत. तुमच्या छोट्याशा कुटुंबाला आयुष्यभर प्रेम आणि आनंद लाभो."
आणखी एकाने लिहिले, "दुआ आणि देवी, एकाच कुटुंबाला मिळालेले दोन सुंदर आशीर्वाद." तर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली, "अगं माझ्या लाडक्या, तिचा जन्म राधाष्टमीच्या दिवशी झाला आणि तिचं नाव देवी ठेवलं आहे, ही किती सुंदर गोष्ट आहे!"
'देवी' नावाचं नेटकऱ्यांकडून स्वागत
रणवीर आणि दीपिकाने आपल्या पहिल्या मुलीचे नाव 'दुआ' ठेवल्यानंतर या जोडप्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांनी दुसऱ्या मुलीचे नाव 'देवी' ठेवल्यामुळे नेटकरी आनंद व्यक्त करत आहेत.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचे आगामी चित्रपट
चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, रणवीर सिंह लवकरच 'प्रलय' या चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. दरम्यान, दीपिकाचा पुढील प्रदर्शित होणारा चित्रपट 'किंग' आहे. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय दीपिकाकडे 'राका' हा चित्रपटही आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲटली करत असून, अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. रणवीर आणि दीपिकाचे आगामी चित्रपट पाहण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असतील, यात शंका नाही.
दरम्यान, 'देवी पदुकोण सिंह' या नावाची घोषणा केल्यानंतर दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांमध्ये या नावाची चर्चा रंगली आहे. चिमुकलीचं नाव जितकं सुंदर आहे, तितकाच तिच्यासोबतचा कुटुंबाचा फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर या गोड कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, 'देवी' या नावाचं कौतुकही केलं जात आहे.