

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या सोशल मीडियावरील एका खास पोस्टमुळे ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. तिच्या शांत स्वभावासोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते आणि यावेळीही तसंच चित्र दिसत आहे.
लेक दुआच्या फोटोने चर्चांना उधाण
दीपिकाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक गोंडस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिची मुलगी दुआ पदुकोण सिंह हिच्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट किट दिसत आहे. त्या किटवर दोन गुलाबी रेषा स्पष्ट दिसत असल्याने चाहत्यांनी याचा अर्थ पॉझिटिव्ह निकाल असा लावला आहे. विशेष म्हणजे, या पोस्टला दीपिकाने कॅपशनमध्ये फक्त ‘इव्हिल आय’ इमोजी दिले, ज्यामुळे चर्चांना अधिक उधाण आले.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
या पोस्टमध्ये दीपिका आणि रणवीर सिंह यांचे हातही दिसत असल्याने ही एक खास कौटुंबिक घोषणा असल्याचे मानले जात आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट समोर येताच चाहत्यांनी आनंद व्यक्त करत शुभेच्छांचा वर्षाव केला. “दुआ आता मोठी बहीण होणार” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या.
आधीपासूनच सुरू होत्या चर्चा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दीपिका पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अलीकडेच ती एका कार्यक्रमात दिसली असताना तिच्या पोशाखावरून आणि वावरावरूनही चाहत्यांनी अंदाज लावले होते. आता या पोस्टनंतर त्या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.
दीपिका आणि रणवीर सिंह यांनी २०१८ मध्ये विवाह केला होता. सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांना मुलगी आणि त्यांनी मुलीचं नाव ‘दुआ’ ठेवलं. आता या नव्या पोस्टमुळे त्यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाची चाहूल लागल्याची चर्चा रंगली आहे.
मात्र, या सर्व चर्चांदरम्यान दीपिका किंवा रणवीर सिंह यांच्याकडून अधिकृतपणे स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही.