मराठी चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक आणि अध्यात्मिक विषयांना भव्यतेने साकारणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता आपल्या नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. “महाराष्ट्राच्या चरणी नवे समर्पण” अशी भावस्पर्शी घोषणा करत दिग्पाल लांजेकर यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या आगामी चित्रपटाचा संकेत दिला आहे.
‘शिवराज अष्टकाच्या’ रूपाने घराघरांत पोहचलेले लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर शिलेदारांचा इतिहास जागतिक सिनेमांच्या पातळीवर नेऊन ठेवला आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज', 'सुभेदार' आणि अलीकडील 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटांमधून आपल्या वेगळ्या शैलीची छाप मराठी प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे.
इतिहास, भक्ती, आणि नाट्य यांचं सुंदर मिश्रण त्यांच्या चित्रपटांतून पाहायला मिळतं. 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या अध्यात्मिक चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही भरभरून प्रेम मिळालं. मुक्ताईंच्या भावविश्वाला त्यांनी ज्या तरलतेनं साकारलं, त्यातून अध्यात्म आणि समाजभान यांचा सुरेख मेळ साधलेला दिसतो.
आता ते एका नवीन चित्रपटासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटाचं नाव अजून जाहीर झालेलं नाही, पण नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून हा चित्रपट महाराष्ट्रासाठी असणाऱ्या प्रेमभावनेनं भरलेला असणार, हे नक्की.
"नवीन समर्पण... ७ नोव्हेंबरला... महाराष्ट्राच्या चरणी..." अशा ओळींसह आलेल्या या घोषणेनं, हा चित्रपट ‘शिवराज अष्टक’ मालिकेतील पुढचा चित्रपट आहे की दिग्पाल लांजेकर यांची नवीन निर्मिती आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.