

मराठी सिनेसृष्टीत विक्रमी यश मिळवलेला आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा 'दशावतार' आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून थेट दाक्षिणात्य प्रेक्षकांच्या मनात घर करणार आहे. प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे आणि सलग यशामुळे हा सुपरहिट सिनेमा आता मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
२१ नोव्हेंबरला केरळमध्ये ‘दशावतार’ प्रदर्शित होणार
'दशावतार'ने चित्रपटगृहात ५० दिवसांचा टप्पा पार केला असून, तो आजही अनेक ठिकाणी हाऊसफुल चालू आहे. या यशस्वी प्रवासात एक नवा अध्याय जोडला जात आहे. कारण चित्रपट आता २१ नोव्हेंबर रोजी केरळमध्ये मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच त्याचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं असून, त्यावर चाहत्यांकडून प्रचंड उत्साह व्यक्त केला जात आहे.
'दशावतार'चे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनीही आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले: "चित्रपटाला भाषेचं बंधन नसतं! जगभरातल्या मराठी रसिक प्रेक्षकांनी ज्या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलंय, आजही देताएत, तो आपला ‘दशावतार’ आता मल्याळम भाषेतून केरळमधल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होतोय! २१ नोव्हेंबर पासून!"
ही पोस्ट ‘दशावतार’चे प्रमुख कलाकार सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांनीही शेअर केली असून, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दशावतार कलेला आयुष्य वाहून घेतलेल्या बाबुली मेस्त्री या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
महाराष्ट्राबाहेरही ‘दशावतार’ला दाद
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित, सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘दशावतार’ १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला.
दिलीप प्रभावळकर यांच्या प्रभावी अभिनयासह, दमदार कथा आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे या चित्रपटाने महाराष्ट्रातच नव्हे तर बडोदा, इंदूर, हैद्राबाद, बंगळुरू, दिल्ली ते गुवाहाटीपर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकली.
फक्त भारतातच नाही, तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, नॉर्वे आणि संयुक्त अरब अमीरात येथेही ‘दशावतार’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. अनेक अमराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक करत त्याच्या विषयवस्तूचं आणि सादरीकरणाचं अभिनंदन केलं.