दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी; FIR दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

Diljit Dosanjh Bengaluru Concert Bomb Threat : धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला आणि त्यातील इशाऱ्यांमध्ये किती तथ्य आहे, याचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे.
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी; FIR दाखल, पोलिसांकडून तपास सुरू
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी; FIR दाखल, पोलिसांकडून तपास सुरूसंग्रहित छायाचित्र
Published on: 

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला बॉम्बस्फोटाची धमकी आल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. २९ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये होणाऱ्या कॉन्सर्टमध्ये IED स्फोट घडवण्याचा इशारा देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी FIR दाखल केली असून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, याआधी मुंबईतील कॉन्सर्टलाही बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे दिलजीतच्या आगामी कार्यक्रमांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बंगळुरूतील कॉन्सर्टला IED स्फोटाची धमकी

२९ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमधील मादावरा येथील NICE ग्राउंड्सवर दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट होणार आहे. या कार्यक्रमात IED स्फोट घडवून आणण्याचा इशारा देणारा ई-मेल ९ नोव्हेंबर रोजी हुबळी-धारवाड महानगरपालिका आयुक्तांच्या अधिकृत ई-मेलवर पाठवण्यात आला होता. या ई-मेलमध्ये कॉन्सर्टला येणाऱ्या प्रेक्षकांना मुलांना सोबत न आणण्याचा, बेवारस आयफोनला हात न लावण्याचा आणि मेट्रोने प्रवास टाळण्याचा इशाराही देण्यात आला होता.

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी; FIR दाखल, पोलिसांकडून तपास सुरू
Mumbai : ‘जलसा’ बॉम्बने उडविण्याची धमकी ठरली अफवा; महापालिका कार्यालयासह, पीएनबीच्या शाखाही लक्ष्य

या धमकीनंतर पोलिसांनी बंगळुरू इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर (BIEC) च्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट २९ नोव्हेंबर रोजी NICE ग्राउंड्सवर नियोजित असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. त्यानंतर या प्रकरणी नॉर्थ CEN क्राइम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(४) (गुन्हेगारी धमकी) तसेच ३५३(१)(ब) (सार्वजनिक गैरप्रकार घडवण्यास प्रवृत्त करणारी विधाने) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. धमकीचा ई-मेल पाठवण्यासाठी वापरण्यात आलेल्या खात्याचा IP अ‍ॅड्रेस आणि ई-मेलचा मूळ स्रोत शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

पुणे न्यायालयाला आलेल्या ई-मेलमध्ये मुंबईतील कॉन्सर्टचाही उल्लेख

दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाला धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. या ई-मेलमध्ये पुणे न्यायालयाच्या संकुलात बॉम्बस्फोट घडवण्याचा इशारा देण्यासोबतच दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टचाही उल्लेख करण्यात आला होता. २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे हा कॉन्सर्ट होणार आहे. या कार्यक्रमातही बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आल्याचे वृत्त आहे.

या ई-मेलमध्ये खलिस्तान नॅशनल आर्मी आणि बब्बर खालसा यांचाही उल्लेख असल्याचे समोर आले आहे. धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला आणि त्यातील इशाऱ्यांमध्ये किती तथ्य आहे, याचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे.

याआधीही दिलजीतच्या मुंबई कॉन्सर्टला धमकी

यापूर्वी २३ ऑक्टोबर रोजी मुंबई महापौर कार्यालयाला आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्येही दिलजीत दोसांझच्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुंबईतील कॉन्सर्टचा उल्लेख होता. या ई-मेलमध्ये महालक्ष्मी रेसकोर्सवरील कार्यक्रमाला लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. आता पुणे न्यायालयाला आलेल्या ई-मेलमध्येही मुंबईतील कॉन्सर्टचा उल्लेख झाल्याने या कार्यक्रमाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अहमदाबादच्या कॉन्सर्टमध्ये मोबाइल चोरीची घटना

दरम्यान, यापूर्वी अहमदाबादमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टदरम्यान मोबाइल चोरीची घटना समोर आली होती. महागडे मोबाइल फोन चोरण्यासाठी दिल्लीहून आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या कॉन्सर्टमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी आले होते, असा पोलिसांचा आरोप आहे.

वृत्तानुसार, प्रीमियम विभागात प्रवेश मिळवण्यासाठी या दोघांनी गोल्ड श्रेणीची तिकिटे खरेदी केली होती. या विभागातील प्रेक्षकांकडे महागडे मोबाइल फोन असण्याची शक्यता असल्याने त्यांनी या भागाला लक्ष्य केल्याचा संशय आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोहम्मद गुलजार आणि अश्रफ हुसैन इद्रिशी या दोघांना अटक केली. दोघेही दिल्लीतील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून सुमारे ४.३ लाख रुपये किमतीचे चोरीचे ११ मोबाइल फोन जप्त करण्यात आले.

पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले

कॉन्सर्ट सुरू असताना अनेक प्रेक्षकांनी मोबाइल फोन हरवल्याच्या तक्रारी स्टेडियममधील नियंत्रण कक्षाकडे केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. संशयितांना पकडण्यासाठी स्टेडियमच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वारांजवळही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी; FIR दाखल, पोलिसांकडून तपास सुरू
Diljit Dosanjh Indore Concert : दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास, दोघांना अटक

कॉन्सर्ट संपल्यानंतर प्रेक्षक बाहेर पडत असताना दोन व्यक्ती पोलिसांची उपस्थिती पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता विविध कंपन्यांचे ११ मोबाइल फोन आढळले. हे आरोपी सुमारे सहा मोबाइल चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)