
प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव याच्या गुरुग्राममधील घरावर रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान तिघे हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि एल्विशच्या निवासस्थानावर तब्बल २५ ते ३० राउंड गोळ्या झाडल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. घटनेच्या वेळी घरात केवळ केअरटेकर होता, तर एल्विश यादव हरियाणाबाहेर होता.
गोळीबारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घराच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर गोळ्यांचे निशाण स्पष्ट दिसत आहेत. फॉरेन्सिक तपासणीसाठी तज्ञांना बोलावण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
या घटनेबाबत एल्विश यादवच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले, “गोळीबारापूर्वी आम्हाला कोणतीही धमकी मिळाली नव्हती. आम्ही झोपलो असताना तीन मास्कधारी हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यापैकी एक जण गाडीतच बसून होता, तर उर्वरित दोघांनी उतरून गोळीबार केला.” सूत्रांच्या माहितीनुसार, एल्विश यादवने अद्याप पोलिसांत औपचारिक तक्रार नोंदवली नाही.
कोण आहे एल्विश यादव?
युट्यूबवरील कंटेंटमुळे प्रसिद्ध झाल्यानंतर एल्विश २०२३ साली बिग बॉस ओटीटीचा विजेता ठरला. नंतर त्याने अनेक संगीत व्हिडिओ आणि चित्रपटांतही काम केले. मात्र, मागच्या वर्षी नोएडा पोलिसांनी त्याला रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केली होती. सापाच्या विषाचा ड्रग्ज म्हणून वापर झाल्याच्या आरोपात त्याचे नाव समोर आले होते. त्यावेळी त्याला जामीन मिळाला होता.