मालवणी रंगभूमीचा अनमोल वारसा हरपला! ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे निधन

गंगाराम गवाणकर यांनी रचलेलं ‘वस्त्रहरण’ हे नाटक मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलं. मालवणी भाषेतलं हे पहिलं नाटक मुख्य प्रवाहात येऊन गाजलं आणि गवाणकर यांना घराघरात प्रसिद्धी मिळवून दिली.
मालवणी रंगभूमीचा अनमोल वारसा हरपला! ‘वस्त्रहरण’कार  गंगाराम गवाणकर यांचे निधन
Published on

मालवणी भाषेला मुख्य प्रवाहात आणणारे आणि मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गवाणकर हे काही महिन्यांपासून आजारी होते आणि दहिसर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्यांनी जगाचा निरोप घेतला. गंगाराम गवाणकर यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

‘वस्त्रहरण’ने गाजवली रंगभूमी

गंगाराम गवाणकर यांनी रचलेलं ‘वस्त्रहरण’ हे नाटक मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलं. मालवणी भाषेतलं हे पहिलं नाटक मुख्य प्रवाहात येऊन गाजलं आणि गवाणकर यांना घराघरात प्रसिद्धी मिळवून दिली. ज्येष्ठ लेखक पु. ल. देशपांडे यांनीदेखील ‘वस्त्रहरण’ची खुल्या मनाने प्रशंसा केली होती. या नाटकाच्या यशानंतर त्यांनी ‘दोघी’, ‘वनरुम किचन’, ‘वरपरीक्षा’ आणि ‘वर भेटू नका’ यांसारखी अनेक नाटके लिहिली. त्यांच्या या नाटकांना रसिकांनी भरभरून प्रेम दिलं.

नोकरीसोबत जोपासला नाट्यछंद

सुरुवातीच्या काळात एमटीएनएलमध्ये नोकरी करत असताना गवाणकर यांनी आपला नाट्यलेखनाचा छंद जोपासला. १९७१ साली त्यांनी रंगभूमीवरील आपला प्रवास सुरू केला. नाट्यसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना ९६व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते.

मालवणी बोलीभाषेला जागतिक पातळीवर पोहोचवणारा आणि मराठी रंगभूमीला अमूल्य ठेवा देणारा हा कोकणपुत्र आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in