अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. या जोडप्याने अनेकदा या अफवा फेटाळून लावल्या तरी त्यावर पूर्णविराम लागला नाही. आता अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिता आहुजाने गोविंदाच्या ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीबरोबरच्या कथित अफेअरबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे.
स्वतः पैसे कमवण्याचं समाधान वेगळंच असतं
पारस एस. छाब्रा याच्या ‘अब्रा का डब्रा शो’ या पॉडकास्टदरम्यान बोलताना सुनीताने सर्व महिलांना सल्ला दिला की त्यांनी पतीवर पूर्णपणे अवलंबून राहू नये. स्वतःच्या युट्यूबवरील करिअरबाबत विचारलेल्या प्रश्नावर, “सगळं छान चाललं आहे. व्लॉगिंग सुरू केल्यावर चार महिन्यांतच मला यूट्यूब सिल्व्हर बटण मिळालं. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. स्वतः पैसे कमवण्याचं समाधान वेगळंच असतं. नवरा पैसे देतो, पण दहा वेळा विचारल्यावर एकदाच देतो. स्वतःची कमाई ही स्वतःची असते,” असे ती म्हणाली.
गोविंदाकडून ५ बीएचके मागणार
पती गोविंदाकडून मोठं घर मागायचं आहे, असंही सुनीता पुढे हसत हसत म्हणाली. “मी माझी मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धनसोबत चार बेडरूमच्या घरात राहते; गोविंदा आमच्यासोबत राहत नाही. हे घर आमच्यासाठी लहान आहे. या पॉडकास्टद्वारे मला सांगायचंय की, ‘चीची, मला मोठं पाच बेडरूम हॉलचं घर घेऊन दे, नाहीतर काय होतं ते बघ’.”
मी जोवर माझ्या डोळ्यांनी पाहत नाही...
तिच्या आणि गोविंदाच्या नात्यातील तणाव आणि त्याच्या कथित अफेअरबद्दल विचारण्यात आलं असता, "मी जोवर माझ्या डोळ्यांनी पाहत नाही आणि गोविंदाला रंगेहाथ पकडत नाही तोवर मी काहीही जाहीर करणार नाही. गोविंदाचं अफेअर असल्याचं मीही ऐकलं आहे. कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, अमुक आहे, तमूक आहे... पण हे सगळं करायचं हे वय नाही. आता त्याने मुलगी टिना आणि मुलगा यशवर्धनच्या करिअरविषयी विचार करायला हवा."
सुनीता पुढे म्हणाली, "मी हजार वेळा सांगितलं आहे की जोवर मी तोंड उघडत नाही तोवर कशावरही विश्वास ठेवू नका. मी जे बोलते ते खरं बोलते, खोटं कधीच बोलत नाही. माझा नवरा आहे म्हणून मी काही लपवणार नाही . गोविंदाने खरंच असं काही केलं असेल तर मी स्वतः मीडियाला बोलवून सांगेन."
ती पुढे म्हणाली, "जर गोविंदाने खरंच असं काही केलं, तर मी गोविंदाच्या चाहत्यांनाही विचारेन, चाळीस वर्षांची पत्नी पुरेशी नाही का? की आयुष्यात दुसरी कोणी 'xyz व्यक्ती' असायलाच हवी? त्या वेळी चाहते माझ्या बाजूने उभे राहतात की गोविंदाच्या, हेही मला पाहायचं आहे."
सुनिताच्या या मुलाखतीनंतर आता दोघांच्या नात्याबाबत, घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचं लग्न १९८७ मध्ये झालं. त्यांनी आपल्या लग्नाबाबत अनेक वर्षे लपून ठेवलं होतं आणि मुलगी टीना आहुजा हिचा जन्म १९८९ मध्ये झाल्यानंतरच लग्नाबाबत सार्वजनिकपणे भाष्य केलं. या दांपत्याला मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन अशी दोन मुले आहेत.