

बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या ८९व्या वर्षी झालेल्या निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकात बुडाली. अनेक दशकं चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या सुपरस्टारच्या जाण्यानं एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. शेवटच्या क्षणांत त्यांच्या सोबत मुलं आणि पत्नी हेमा मालिनी खंबीरपणे उभे होते. कुटुंब अजूनही या मोठ्या दुःखातून सावरू शकलेलं नाही.
अशातच, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी हेमा मालिनी यांनी अखेर आपल्या भावना व्यक्त केल्या. आयुष्यभर साथ देणाऱ्या जोडीदाराच्या आठवणी सांगताना त्यांनी भावनिक शब्दांत आपलं दु:ख व्यक्त केलं आणि सोबतच काही खास फोटो शेअर करत त्यांच्या सहवासाच्या क्षणांना उजाळा दिला.
"ते माझ्यासाठी सर्वकाही होते…" - हेमा मालिनींची भावूक पोस्ट
धरमजी,
ते माझ्यासाठी खूप काही होते. प्रेमळ पती, ईशा आणि अहानाचे आदर्श वडील, मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक, कवी… आणि आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षणी ‘ज्याच्याकडे मी धाव घेई’ असे माझे सर्वस्व!
ते नेहमीच माझ्या कुटुंबाशी आत्मीयतेने वागले, प्रेम आणि समभावाने प्रत्येकाला आपलंसं केलं.
कलाकार म्हणून त्यांचं अपार कसब, प्रचंड लोकप्रियतेनंतरही असलेली नम्रता आणि सार्वत्रिक आकर्षण यामुळे ते खऱ्या अर्थाने अद्वितीय आयकॉन होते.
माझं वैयक्तिक दु:ख शब्दांत व्यक्तच होऊ शकत नाही… त्यांच्याविना आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कायमच राहील.
आयुष्यभराच्या सहवासानंतर आता फक्त असंख्य आठवणी उरल्या आहेत…”
धर्मेंद्र यांचे अंतिम संस्कार
दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमी येथे पार पडले. या वेळी शाहरुख खान, गोविंदा, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, सायराबानू, आमिर खान, सलमान खान, संजय दत्त, सलीम खान, सिद्धार्थ रॉय कपूर, असे अनेक कलाकार श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.
प्रकृती खालावल्याने उपचार सुरू होते
धर्मेंद्र यांची तब्येत काही काळापासून खराब होती. १० नोव्हेंबर रोजी त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांनी त्यांना घरी हलवण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
धर्मेंद्र यांच्या पश्चात पहिली पत्नी प्रकाश कौर, दुसरी पत्नी हेमा मालिनी, तसेच सहा मुलं सनी देओल, बॉबी देओल, विजेता, अजीता, ईशा आणि अहाना देओल, असा परिवार आहे.
‘ही-मॅन ऑफ इंडियन सिनेमा’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी शोले, चुपके चुपके, आया सावन झूम के, आयी मिलन की बेला, अनुपमा यांसारख्या चित्रपटांमधून अमर भूमिका घडवल्या. त्यांची देखणी उपस्थिती, अभिनयातील सहजता आणि प्रेक्षकांवरील अपार प्रेम आजही कायम आहे.
धर्मेंद्र गेल्यानंतर भारतीय सिनेमात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीच भरून निघणार नाही.