

Hina Khan cancer: हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हिनाला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला कर्करोग झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता हिनाने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना गंभीर आजाराबाबत सांगितले. स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरशी लढा सुरू असल्याचे तिने म्हटले आहे.
हिना खानने शुक्रवारी एक पोस्ट करत आजाराबाबत सांगितले आणि रुग्णालयात उपचार सुरू असल्याचीही माहिती दिली. तसेच, या आजारावर मात करेल आणि पूर्णपणे बरे होऊन परतेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
हिनाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर लिहिले, "माझ्या 'हिनाहोलिक' आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या, काळजी करणाऱ्या सर्व लोकांसोबत काही महत्त्वाची बातमी शेअर करायची आहे. मला स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. असे असूनही मी सर्वांना सांगू इच्छिते की मी ठीक आहे. या आजारावर मात करण्यासाठी मी मजबूत, दृढनिश्चय आणि पूर्णपणे वचनबद्ध आहे. माझे उपचार सुरू झाले आहेत आणि या आजारावर मात करण्यासाठी मी शक्य ते सर्व काही करण्यास तयार आहे.
कॅन्सरच्या लढाईत हिनाने चाहत्यांकडून पाठिंबा मागितला आहे आणि लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. माझ्या खासगी आयुष्याचा आदर राखा, असेही तिने म्हटले आहे.
दरम्यान, या बातमीने हिनाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तथापि, काही चाहत्यांनी यापूर्वीच हिनाला कर्करोग असल्याची शक्यता वर्तवली होती. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये तिने गंभीर आजाराबाबत हिंट दिली होती, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. ती पोस्ट आता व्हायरल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिना सोशल मीडियावरही आधीसारखी सक्रीय नव्हती.