
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण तिच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही तिला दिलासा देणारी याचिका फेटाळून लावली आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या २०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिनवर असलेले आरोप रद्द करण्याची मागणी तिच्या वकिलांनी केली होती. परंतु, सोमवारी (दि. २१) सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका नामंजूर केली. त्यामुळे अभिनेत्रीला आता थेट ट्रायल कोर्टात हजेरी लावण्याची गरज आहे.
जॅकलिन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभागी
न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि एजी मसीह यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) असा आरोप केला आहे, की सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला अंदाजे ७ कोटी रुपयांच्या लक्झरी भेटवस्तू दिल्या. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहित असूनही तिने त्या भेटवस्तू स्वीकारल्या. एवढेच नाही, तर सुरुवातीला जॅकलिनने सुकेशशी संबंध नाकारले, परंतु पुरावे समोर आल्यानंतरच ते कबूल केले. तसेच फोन डेटा डिलीट केल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
जॅकलिनने या आधी हे आरोप नाकारत दिल्ली उच्च न्यायालयात दिलासा मागितला होता. मात्र, उच्च न्यायालयाने ३ जुलै रोजी तिची याचिका फेटाळून लावली. यानंतर तिने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
जॅकलिन फक्त अभिनेत्री, फसवणुकीशी संबंध नाही - वकील
यावेळी जॅकलिनचे वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला, की तिचा या फसवणुकीशी काहीही संबंध नाही. तिच्या वतीने रोहतगी यांनी सांगितले, की “मी एक अभिनेत्री आहे. सुकेश फक्त माझ्यावर मोहित झाला होता. त्याने मला बॅग्ज, दागिने आणि इतर भेटवस्तू दिल्या. मी त्याला २०० कोटी रुपयांच्या हेराफेरीत मदत केल्याचा कोणताही पुरावा नाही.'' तसेच, त्यांनी असेही स्पष्ट केले की खंडणी किंवा मकोका अंतर्गत तिच्यावर कोणताही आरोप नाही, त्यामुळे तिला आरोपी न मानता साक्षीदार मानले जावे.
युक्तिवाद सुप्रीम कोर्टाने फेटाळला
मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत ईडीच्या बाजूने निरीक्षण नोंदवले. “तुम्हाला भेट म्हणून मिळालेल्या वस्तू या फसवणुकीतून आलेल्या पैशाचाच भाग आहेत, असा आरोप आहे. आम्हाला माहित आहे, कायदा असा आहे की कोणीही अशा प्रकारे सहभागी ठरू शकतो. दोन खूप जवळचे मित्र आहेत. त्यातील एकाने दुसऱ्याला काहीतरी दिले आणि नंतर त्याने गुन्हा कबूल केला तर परिस्थिती खूप कठीण होते,” असे न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी स्पष्ट केले.
अखेर सुप्रीम कोर्टाने जॅकलिनची याचिका फेटाळून लावत तिच्या भूमिकेचा सविस्तर तपास ट्रायल कोर्टात करावा, असे आदेश दिले. त्यामुळे आता या प्रकरणात जॅकलिनला कोणताही दिलासा मिळालेला नाही.