गीतकार आणि लेखक जावेद अख्तर नेहमीच आपल्या बिनधास्त आणि रोखठोक स्वभावामुळे चर्चेत राहतात. सोशल मीडियावर ते नेहमीच अॅक्टिव्ह असतात आणि ट्रोलर्सना करारा उत्तर देण्यातही मागे राहत नाहीत. स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी जावेद यांनी X अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या. मात्र, या पोस्टवर एका युजरने त्यांना ‘पाकिस्तानी’ म्हणत ट्रोल केले. पण जावेद कुठे गप्प बसणार होते, त्यांनी लगेचच त्या ट्रोलरला चोख उत्तर दिलं.
१५ ऑगस्टनिमित्त केलेल्या पोस्टवर जावेद अख्तरांना केले ट्रोल
१५ ऑगस्टला जावेद अख्तर यांनी लिहिलं होतं, “माझ्या सर्व भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांनी ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे की, हे स्वातंत्र्य आपल्याला असंच थाळीत सजवून मिळालेलं नाही. यासाठी अनेकांनी तुरुंगवास भोगला, फाशीची शिक्षा भोगली, त्याग केला आणि मग आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. हा अमूल्य वारसा आपण जपायला हवा.” त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, मात्र एकाने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत कमेंट केली की, “तुमचा स्वातंत्र्यदिन तर १४ ऑगस्टलाच असतो.”
ट्रोलरला जावेद अख्तरांचे सडेतोड उत्तर
ट्रोलरच्या या कमेंटवर जावेद अक्षरशः भडकले आणि त्यावर प्रत्युत्तर देत लिहिलं की, “बेटा, जेव्हा तुझा आजा-पणजा इंग्रजांचे बूट चाटत होता, तेव्हा माझे पूर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. त्यामुळे स्वतःच्या औकातीत रहा.”
जावेद यांच्या या उत्तराला सोशल मीडियावर भरभरून पाठिंबा मिळाला असून अनेकांनी त्यांच्या निर्भीड स्वभावाचं कौतुक केलं आहे.