सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या ९८ वर्षी निधन झाले. दीर्घकाळ आजाराने त्रस्त असलेल्या कामिनी यांनी आज (दि. १४) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Published on

बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या ९८ वर्षी निधन झाले. दीर्घकाळ आजाराने त्रस्त असलेल्या कामिनी यांनी आज (दि. १४) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आधीचे नाव बदलून सिनेसृष्टीत पदार्पण

कामिनी कौशल यांचा जन्म लाहोरमध्ये झाला. त्यांचे आधीचे नाव उमा कश्यप होते. दिग्दर्शक चेतन आनंद यांनी उमा कश्यप या नावामुळे गोंधळ होऊ नये म्हणून त्यांना कामिनी कौशल हे स्क्रीन नाव दिले होते. कामिनी यांचे कुटुंब उच्चशिक्षित होते; वडील शिवराम कश्यप हे एक प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ होते. त्यांनी लाहोरमध्ये वनस्पतिशास्त्र विभागाची स्थापना केली. कामिनी यांचे बालपण घोडेस्वारी, भरतनाट्यम, पोहणे आणि हस्तकला यांसारख्या अनेक कला शिकण्यात गेले. त्यांनी रेडिओ नाटके आणि रंगभूमीवरील नाट्यतज्ञतेत देखील भाग घेतला, ज्याचा फायदा त्यांना अभिनयात झाला.

कामिनी कौशल यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी १९४६ मध्ये ‘नीचा नगर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकणारा हा चित्रपट होता.

कामिनी कौशल यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेले चित्रपट केले. त्यांनी ‘दो भाई’ (१९४७), ‘शहीद’ (१९४८), ‘नदियां के पार’ (१९४८), ‘जिद्दी’ (१९४८), ‘पारस’ (१९४९), ‘नमुना’ (१९४९), ‘आरजू’ (१९४९), ‘शबनम’ (१९४९) यांसारख्या चित्रपटांत काम केले. १९५६ मध्ये ‘आबरू’, १९५७ मध्ये ‘बडे सरकार’, १९५८ मध्ये ‘जेलर’ आणि ‘नाइट क्लब’ तसेच १९६३ मध्ये ‘गोदान’ या चित्रपटांमधील भूमिका त्यांच्या अभिनयाची शिदोरी ठरल्या.

कामिनी कौशल यांनी दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद आणि अशोक कुमार यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले. विशेषतः ‘नदियां के पार’, ‘शहीद’, ‘शबनम’ आणि ‘आरजू’ या चित्रपटांत दिलीप कुमार यांच्याबरोबरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अत्यंत लोकप्रिय ठरली. त्यांनी अलीकडेच प्रसिद्ध झालेले ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘कबीर सिंह’, ‘लाल सिंह चड्डा’ या चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.

त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक युग संपले आहे, पण त्यांच्या चित्रपटांमधील योगदान आणि अभिनयाची छाप सदैव प्रेक्षकांच्या मनात राहील.

logo
marathi.freepressjournal.in