कॅनडातील सरे (Surrey) शहरात कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. ही सलग तिसरी घटना असून, लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी (दि. १६ ऑक्टोबर) रात्री उशिरा एका कारमधून अज्ञात हल्लेखोराने कॅफेकडे सलग गोळ्या झाडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हल्लेखोर कॅफेवर गोळ्या झाडताना दिसत आहेत. हल्लेखोरांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना म्हटले, “मी, कुलदीप सिद्धू आणि गोल्डी ढिल्लन, ‘कॅप्स कॅफे’वरील तिन्ही गोळीबारांच्या घटनांची जबाबदारी घेतो. आमचं सर्वसामान्य लोकांशी कोणतंही वैर नाही.”
यानंतर गँगकडून दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं आहे, “ज्यांच्याशी आमचा वाद आहे त्यांनी आमच्यापासून दूर राहावं. जे बेकायदेशीर (अवैध) काम करतात आणि लोकांना पैसे देत नाहीत त्यांनीही तयार राहावं."
सलमान खानशी असलेले संबंध कारणीभूत?
या हल्ल्यामागे कपिल शर्मा आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांचे निकट संबंध असल्याचं कारण बिश्नोई गँगने याआधीच दिलं होतं. सलमान खानविरोधात आधीपासूनच आक्रमक असलेली ही गँग आता कपिल शर्मालाही लक्ष्य करत असल्याचं पोलिस सूत्रांचं म्हणणं आहे.
तीन महिन्यांत तीन गोळीबाराच्या घटना
‘कॅप्स कॅफे’वर पहिला गोळीबार १० जुलै २०२५ रोजी झाला होता, म्हणजेच कॅफेच्या उद्घाटनानंतर केवळ काहीच दिवसांनी. दुसरी घटना ७ ऑगस्ट २०२५ रोजी घडली आणि आता ऑक्टोबरमध्ये तिसऱ्यांदा कॅफेवर गोळीबार झाला आहे.
सलग तीन हल्ल्यांमुळे स्थानिक प्रशासनाने सतर्कता वाढवली असून कॅफेजवळ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कॅनडात बिश्नोई गँगवर दहशतवादी ठपका
कॅनडा सरकारने काही आठवड्यांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसंगरी यांनी म्हटलं होतं की, “हिंसा आणि दहशतीला कॅनडात कोणतीही जागा नाही. समाजात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.”
या निर्णयानंतर बिश्नोई गँगची मालमत्ता, वाहने आणि निधी गोठवण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांवर कारवाईसाठी पोलिसांना अधिक अधिकार देण्यात आले आहेत.
कपिल शर्माची अद्याप प्रतिक्रिया नाही
या घटनेवर अद्याप कपिल शर्मा किंवा त्यांच्या व्यवस्थापनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सलग तिन्ही गोळीबारांनंतर कपिलच्या चाहत्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे.