
दिवंगत उद्योगपती संजय कपूरच्या तब्बल ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वडिलांच्या संपत्तीत आपला हक्क मागितला आहे.
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे २००३ मध्ये लग्न झाले. ते २०१६ पर्यंत एकत्र होते. १३ वर्षांच्या संसारानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. संजय कपूरचे १२ जून रोजी निधन झाले. याचिकेत मुलांनी संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेववर संपत्ती हडपण्याचे आरोप केले आहेत.
सावत्र आईवर फसवणुकीचे आरोप
वादाचे केंद्रबिंदू २१ मार्च २०२५ रोजीचे कथित मृत्युपत्र आहे. त्यानुसार संजय कपूरची संपूर्ण वैयक्तिक मालमत्ता प्रिया सचदेवकडे सोपवली गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र, करिश्माच्या मुलांचे म्हणणे आहे की हे मृत्युपत्र बनावट आणि संशयास्पद परिस्थितीत तयार केलेले आहे.
मुलांनी युक्तिवाद केला आहे, की प्रियाने दिनेश अग्रवाल आणि नितीन शर्मा या दोन साथीदारांसह मृत्युपत्र सात आठवड्यांहून अधिक काळ दडवून ठेवले आणि अखेर ३० जुलै २०२५ रोजी कुटुंबाच्या बैठकीत ते उघड केले. तसेच मृत्युपत्राची मूळ प्रत किंवा अधिकृत प्रत त्यांना दाखवण्यात आलेली नाही.
या खटल्यात प्रिया, तिचा अल्पवयीन मुलगा, संजय कपूरची आई राणी कपूर आणि मृत्युपत्राच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त श्रद्धा सुरी मारवाह यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
...तोपर्यंत वैयक्तिक मालमत्ता गोठवा
याचिकेत करिश्मा कपूरच्या मुलांनी न्यायालयाला आपल्याला वर्ग १ कायदेशीर वारस घोषित करण्याची विनंती केली आहे. तसेच, वडिलांच्या संपत्तीचे पाच हिस्से करून प्रत्येकी एक हिस्सा देत मालमत्तेचे विभाजन करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच, अंतरिम दिलासा म्हणून त्यांनी प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत संजय कपूरच्या सर्व वैयक्तिक मालमत्ता गोठवण्याची मागणी केली आहे.