

बॉलिवूडमधून एक गोड आणि आनंदाची बातमी आली आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल अखेर पालक झाले आहेत. ७ नोव्हेंबर रोजी कतरिनानं एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, चाहत्यांसह संपूर्ण बॉलिवूडनं या नव्या पालकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी
विकी आणि कतरिनानं शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. या पोस्टसोबत त्यांनी लिहिलं, “आमच्या लाडक्या बाळाचं आगमन झालं आहे. प्रेमाने आणि कृतज्ञतेनं आम्ही आमच्या बेबी बॉयचं स्वागत केलं आहे.” या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला.
ज्युनिअर कौशल’साठी आजोबांची खास पोस्ट
विकी कौशलचे वडील आणि कतरिनाचे सासरे शाम कौशल आजोबा बनल्यानंतर भावुक झाले. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत देवाचे आभार मानले. शाम कौशल म्हणाले, “देवाचे मनापासून आभार. कालपासून देव आमच्यावर खूप खुश आहे. माझ्या मुलांवर आणि ‘ज्युनिअर कौशल’वर देवाची अशीच कृपा राहो. आम्ही सगळे खूप आनंदी आणि भाग्यवान आहोत. आजोबा बनून मनापासून आनंद झाला आहे. देव सर्वांचं रक्षण करो.”
४२ वर्षांच्या कतरिना कैफनं आई झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
कतरिना आणि विकीनं डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. जसं दोघांनी आपलं नातं आणि लग्न खाजगी ठेवलं, तसंच त्यांनी कतरिनाच्या प्रेगन्सीबद्दलही सर्वकाही लाईमलाइटपासून दूर ठेवलं होतं. सप्टेंबर महिन्यातच त्यांनी प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. आता मात्र चाहत्यांना त्यांच्या बाळाचं नाव आणि पहिला फोटो पाहण्याची उत्सुकता लागली आहे.