
बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल. गेल्या काही महिन्यांपासून ही जोडी लवकरच आई-बाबा होणार असल्याच्या चर्चेत आहे. मात्र या दोघांनीही याबाबत कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही. तरीदेखील कतरिनाच्या सार्वजनिक ठिकाणी अचानक कमी झालेल्या उपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये कुतूहल अधिक वाढलं आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, कतरिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देऊ शकते. या काळात विकीसुद्धा आपल्या कामातून ब्रेक घेणार असल्याची चर्चा आहे. कतरिनाने सध्या सर्व प्रोजेक्ट्स पुढे ढकलले असून ती पूर्णपणे आपल्या तब्येतीची काळजी घेत आहे. जर हे रिपोर्ट खरे ठरले, तर २०२५ मध्ये पालक झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत कतरिना-विकीची भर पडेल.
जुलै महिन्यात ही जोडी अलिबागला जाताना फेरी बोटमध्ये दिसली होती. तेव्हा कतरिनाने पांढरा, लूज शर्ट परिधान केला होता. यावेळी तिच्या चालण्याच्या ढंगामुळे सोशल मीडियावर गरोदरपणाविषयी चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतरपासून ती कुठेही दिसली नसल्याने या चर्चांना आणखी वेग मिळाला आहे.
कतरिना आणि विकी या दोघांनीही याबाबत कोणताही अधिकृत खुलासा केलेला नसला, तरी चाहते या दोघांकडून आनंदाच्या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ही बातमी खरी ठरते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.