

ऑनलाइन प्रोफाइल, राईट स्वाइप, पहिलं चॅटिंग आणि त्यानंतर लग्नाचा विचार! आजच्या डिजिटल युगात जोडीदार शोधण्याची पद्धत बदलली आहे. मात्र, प्रेम जुळल्यानंतर लग्नापर्यंतचा प्रवास खरंच इतका सोपा असतो का? याच प्रश्नाभोवती फिरणाऱ्या 'लग्न आणि बरंच काही' या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ट्रेलरसोबत चित्रपटातील दोन गाणीही प्रदर्शित करण्यात आली आहेत.
प्रेम, लग्न आणि बदलत्या नात्यांची गोष्ट
'लग्न आणि बरंच काही' या चित्रपटात आजच्या पिढीचे विचार, प्रेमातील अपेक्षा आणि लग्नानंतर नात्यांमध्ये होणारे बदल पाहायला मिळणार आहेत. लग्न म्हणजे प्रेमकथेचा शेवट की एका नव्या प्रवासाची सुरुवात, हा प्रश्न चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ही कथा केवळ लग्नापुरती मर्यादित नाही. नात्यांमधील समतोल, स्वतःची ओळख आणि महिलांच्या भावविश्वालाही चित्रपटात महत्त्व देण्यात आलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये विनोदी प्रसंगांसोबत भावनिक क्षणांचीही झलक पाहायला मिळते.
चित्रपटाचा ट्रेलर पाहा
वैशाली सामंतच्या आवाजातील गाण्यांची मेजवानी
चित्रपटाच्या ट्रेलरसोबत 'मला लग्नाची झालिया घाई' आणि 'साखरपुडा' ही दोन गाणीही प्रदर्शित झाली आहेत. या चित्रपटाच्या संगीताची धुरा प्रसिद्ध गायिका वैशाली सामंतने सांभाळली आहे. तिने चित्रपटातील गाण्यांना आवाजही दिला आहे. याशिवाय अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, सुरेश वाडकर, मैथिली जोशी आणि अवनी तुषार नान्नजकर यांचाही चित्रपटातील गाण्यांमध्ये सहभाग आहे.
चित्रपटात आणखी कोणते कलाकार?
पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांच्यासोबत अक्षया नाईक, सुकन्या गुरव, भारती पाटील यांच्यासह इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
चित्रपटाचं दिग्दर्शन वेदांती चंद्रकांत दाणी यांनी केलं आहे. यशश्री मसूरकर यांनी कथा लिहिली असून, अंजली तुषार नान्नजकर आणि डॉ. संजना सुरेश पै या निर्मात्या आहेत. नाद स्टुडिओस प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अव्यान आर्ट्स आणि म्हाळसा एंटरटेनमेंट यांनी केली आहे. पिकल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने हा चित्रपट साकारण्यात आला आहे.
'लग्न आणि बरंच काही' कधी प्रदर्शित होणार?
प्रेम, लग्न, नाती आणि त्यातील गमतीजमती उलगडणारा 'लग्न आणि बरंच काही' हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.