लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'

Lagna Ani Barach Kahi Marathi Movie : 'लग्न आणि बरंच काही'च्या टीमने नवशक्तिसोबत साधला खास संवाद. पूजा सावंत, अभिजीत खांडकेकर, अक्षया नाईक आणि दिग्दर्शिका वेदांती दाणी यांनी उलगडली चित्रपटाची गोष्ट आणि व्यक्तिरेखांचं वेगळेपण.
लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'
लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'
Published on: 

लग्न म्हटलं की प्रेम, अपेक्षा, जबाबदाऱ्या, तडजोडी आणि नात्यांमधील अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी समोर येतात. लग्नाबद्दल प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. कुणासाठी लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ, तर कुणासाठी स्वतःचं स्वातंत्र्य आणि अपेक्षा जपत नव्या नात्याची सुरुवात. लग्नाकडे पाहण्याचे असेच वेगवेगळे दृष्टिकोन मांडणारा 'लग्न आणि बरंच काही' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अभिनेता अभिजीत खांडकेकर, अभिनेत्री पूजा सावंत, अक्षया नाईक आणि दिग्दर्शिका वेदांती दाणी यांनी 'नवशक्ति'च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी चित्रपटाची संकल्पना, व्यक्तिरेखांचं वेगळेपण, लग्नसंस्था आणि स्त्री-पुरुष समानता अशा विविध विषयांवर दिलखुलास गप्पा रंगल्या.

'लग्नाचा लाडू खाल्ला तरी पश्चात्ताप...'

चित्रपटाची संकल्पना कशी आकाराला आली, या प्रश्नावर दिग्दर्शिका वेदांती दाणी यांनी लग्नाच्या लाडूचं उदाहरण दिलं. लग्नाचा लाडू खाल्ला तरी पश्चात्ताप आणि नाही खाल्ला तरी हुरहूर, अशी लग्नाबाबत अनेकांची अवस्था असते. याच गंमतीशीर परिस्थितीतून लग्नाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन या चित्रपटात मांडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

अनेक रोमँटिक कॉमेडी चित्रपटांमध्ये मुली किती डिमांडिंग असतात, त्यांच्या अपेक्षा काय असतात किंवा त्यांच्या स्वभावामुळे नात्यांमध्ये कोणत्या गंमतीजमती घडतात, हे दाखवलं जातं. मात्र, लग्नाबद्दल महिलांना स्वतःला नेमकं काय वाटतं, त्यांची मतं आणि अपेक्षा काय असतात, हा विचार या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं दिग्दर्शिकेने स्पष्ट केलं. लग्न झालेल्या आणि अविवाहित महिलांच्या भावना, अनुभव, प्रेम, निराशा आणि जिव्हाळा अशा अनेक पैलूंना कथेत स्थान देण्यात आलं आहे. चित्रपटाची मूळ कथा यशश्री मसूरकर यांनी लिहिली असून त्यावर टीमने एकत्रितपणे काम करत पटकथा विकसित केल्याचंही त्यांनी सांगितलं.

अभिजीत साकारणार पारंपरिक चौकटीबाहेरचा अनिरुद्ध

या चित्रपटात अभिजीत खांडकेकर अनिरुद्ध पाटील ही व्यक्तिरेखा साकारत आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिजीतने अनिरुद्धच्या स्वभावातील वेगळेपण उलगडलं. एक कोल्हापूरचा मुलगा आणि जबाबदार म्हणजे तो रांगडा, मिशा असलेला आणि पारंपरिक पुरुषत्वाच्या चौकटीत बसणारा असलाच पाहिजे, असं नाही. अनिरुद्ध ही व्यक्तिरेखा अशाच काही ठरावीक कल्पनांना छेद देणारी असल्याचं त्याने सांगितलं.

अभिनेता म्हणून एका आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणं, ही भाग्याची गोष्ट असल्याची भावनाही अभिजीतने व्यक्त केली. अनेकदा अभिनेत्याच्या मनात वास्तवात करता न येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी साकारण्याची इच्छा असते. अभिनयाच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा जगता येतात, असं सांगत त्याने अनिरुद्धची भूमिका मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या व्यक्तिरेखेचे आणखी काही पैलू चित्रपटात हळूहळू उलगडणार असल्याचंही त्याने नमूद केलं.

पूजा सावंतच्या भूमिकेत आधुनिक विचारांची पल्लवी

अभिनेत्री पूजा सावंत या चित्रपटात पल्लवी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. लग्नाबाबत स्वतःची ठाम मतं असलेली आणि आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय स्वतःच्या अटींवर घेऊ पाहणारी पल्लवी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. लग्न करायचं असलं तरी ते कोणत्या अटींवर करायचं, याबाबत तिच्या स्वतःच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे अनिरुद्ध आणि पल्लवी यांच्या नात्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितींमधून लग्नाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन समोर येणार आहेत.

विशेष म्हणजे आजच्या डिजिटल युगात एका 'राइट स्वाइप'वर प्रेमाची सुरुवात होऊ शकते. मात्र, नात्यात लग्नाचा विषय आला की त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक गंभीर होतो. या पार्श्वभूमीवर पल्लवीसारख्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून आधुनिक नात्यांमधील अपेक्षा, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लग्नाबाबतचे विचार कथेत मांडण्यात आले आहेत.

अक्षया नाईकची व्यक्तिरेखा ठरणार अनिरुद्ध-पल्लवीमधील 'क्युपिड'

अभिनेत्री अक्षया नाईकनेही आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना तिच्या स्वभावातील वेगळेपण सांगितलं. वयाने तरुण असली तरी विचाराने प्रगल्भ असलेली ही व्यक्तिरेखा आहे. लग्नाकडे तिचा सकारात्मक दृष्टिकोन असून, इतरांनाही ती नातेसंबंधांकडे सकारात्मकतेने पाहण्यासाठी प्रवृत्त करते.

आजच्या पिढीत अनेक जण लग्नाबद्दल फारसा गंभीर विचार करत नाहीत किंवा लग्नसंस्थेकडे वेगळ्या नजरेने पाहतात. मात्र, अक्षयाची व्यक्तिरेखा लग्नसंस्थेला महत्त्व देणारी आहे. विशेष म्हणजे अनिरुद्ध आणि पल्लवी यांच्या नात्यातही ती सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करते. या दोघांमधील नातं जुळवण्यासाठी प्रयत्न करणारी ही व्यक्तिरेखा एका अर्थाने 'क्युपिड' असल्याचं अक्षयाने सांगितलं.

'चित्रपट फक्त स्त्रियांची बाजू घेणारा नाही'

चित्रपटातील स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्द्यावर बोलताना दिग्दर्शिका वेदांती दाणी यांनी महत्त्वाचा विचार मांडला. स्त्रीवाद म्हणजे केवळ महिलांची बाजू घेणं किंवा पुरुषांच्या विरोधात उभं राहणं नव्हे. समानता म्हणजे प्रत्येक गोष्टीत शारीरिकदृष्ट्या समान असणंही नाही, तर नात्यातील दोघांच्या भावनांना समान महत्त्व मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

चित्रपटात महिलांचे विचार आणि अपेक्षा मांडताना पुरुषांच्या भावनांकडेही दुर्लक्ष करण्यात आलेलं नाही. उलट पुरुषांमधील संवेदनशीलता आणि भावनिक बाजूही कथेतून समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाचा विषय स्त्री-पुरुषांमधील वादाच्या पलीकडे जाऊन नात्यातील समान भागीदारीवर भाष्य करणारा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पुरुष प्रेक्षक या कथेकडे कसं पाहतील, याबाबत आपल्या मनात काहीशी भीती असल्याचंही दिग्दर्शिकेने सांगितलं. मात्र, ही कथा कोणत्याही एका बाजूचं समर्थन करणारी नसून नात्यातील समजूतदारपणा आणि भागीदारीचं महत्त्व अधोरेखित करणारी असल्याचं त्यांनी नमूद केलं.

रोमँटिक कॉमेडीतून नात्यांचा वेगळा प्रवास

गंभीर विषयाला हलक्याफुलक्या आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. प्रेक्षकांना आनंद देणारी आणि त्याचवेळी नात्यांबद्दल विचार करायला लावणारी रोमँटिक कॉमेडी तयार करण्याचा टीमचा प्रयत्न असल्याचं या संवादातून समोर आलं.

वेदांती दाणी दिग्दर्शित 'लग्न आणि बरंच काही' या चित्रपटाची कथा यशश्री मसूरकर यांनी लिहिली आहे. अभिजीत खांडकेकर, पूजा सावंत आणि अक्षया नाईक यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in