सुरातले नाते नात्यातले सूर... दिवंगत लता मंगेशकर यांनी आपल्या धाकट्या बहिणीबाबत लिहिलेला लेख

मी अगदी लहान होते आणि बाबांनी मला शाळेत घातले. छान होती शाळा. मुरलीधराच्या देवळाजवळ. पहिल्या दिवशी मी गेले. मास्तर अगदी टिपीकल होते. ब्राह्मणी पगडी...
सुरातले नाते नात्यातले सूर... दिवंगत लता मंगेशकर यांनी आपल्या धाकट्या बहिणीबाबत लिहिलेला लेख
सुरातले नाते नात्यातले सूर... दिवंगत लता मंगेशकर यांनी आपल्या धाकट्या बहिणीबाबत लिहिलेला लेख
Published on

मी अगदी लहान होते आणि बाबांनी मला शाळेत घातले. छान होती शाळा. मुरलीधराच्या देवळाजवळ. पहिल्या दिवशी मी गेले. मास्तर अगदी टिपीकल होते. ब्राह्मणी पगडी, उपरणे आणि त्यांनी पाटीवरती श्रीगणेशाय नमः लिहायला लावले. ते मी लिहिले, मास्तरांनी खूश होऊन शाब्बासकी दिली. म्हणाले, तुला दहा मार्क.

मी आनंदाने घरी आले आणि दुसऱ्या दिवशी आशाला घेऊन शाळेत गेले. मास्तर संतापले आणि म्हणाले, ही तर फारच लहान आहे. ही नाही बसू शकणार वर्गात.

मी खूप रागावले आणि घरी येऊन माईला सांगितले, मी पुन्हा शाळेत जाणार नाही.

का गं? काय झालं? माईने विचारले.

मास्तर आशाला बसू देत नाही आणि ते मला मुळीच खपायचं नाही.

माझी शाळा कायमची सुटली. लहानपणीच्या काही गोष्टी आठवताहेत. काही विसरले. पण एवढे मात्र नक्की की, आशा चांगली जाडजूड, अतिशय मस्तीखोर होती. एकदा मीना आणि मी एका स्टुलवर चढून माईने ठेवलेले तिखट पदार्थ काढायचा प्रयत्न करत होतो. इतक्यात आशा आली आणि म्हणायला लागली, मी काहीही खाल्ल नाही हं.

आमच्या घरी नाटक कंपनी असल्यामुळे भरपूर दूध असायचे. आणि त्या सगळ्या दुधावरची साय ही एकटी खायची. तोंड पुसलं असले म्हणून काय झाले? पायावर तर ती सांडलेली असायचीच. मग माई तिला धपाटा घालायची. पण आशा पहिल्यापासून घरातल्या कामात खूप रस घ्यायची. बाबा आणि माईंचे पाय रात्री चेपायची. घरातली कुठलीही कामे सांगा किंवा नका सांगू. धुणी-भांडी, केरवारा... आशा आनंदाने करी. नंतर आम्ही कोल्हापूरला गेलो तेव्हा आमचे घर दुसऱ्या मजल्यावर होते. रोज ती बादल्यान बादल्या पाणी विहिरीवरून आणून भरत असे.

४६-४७ साली आम्ही मुंबईला नाना चौकात आलो. तेव्हा तर आशाचा अवतार टॉमबॉयचा होता. अंगात खाकी शर्ट, खाकी पँट, डोक्यावर टोपी आणि नाना चौकातली भरपूर मुलं घेऊन त्यांच्याबरोबर ती परेड करायची. इथल्या शंकरशेट देवळाशेजारी एक धर्मशाळा होती. आमची कंपनी बंद झाल्यानंतर आम्ही तिथेच राहात असू. त्या देवळाच्या चौकात आशा या मुलांबरोबर लेफ्ट-राइट करत त्यांना परेड शिकवायची. तिचे दोन शब्द होते. अटेन्शन आणि शू मार्ट. तिला वाटायचे आपण फार मोठी ऑर्डर दिलीये आणि जर त्या मुलांनी काही चुका केल्या तर मारामारी सुरू.

आशाची शाळा सुद्धा आकस्मिक सुटली. तिचे मास्तर तिला रागावले. ती एवढी संतापली की, तिने मास्तरांच्या थोबाडीत मारले. त्यानंतर ती सुद्धा कधी शाळेत गेली नाही.

चौदाव्या वर्षी आशाने लग्न केले. आमचा सगळ्यांचा विरोध होता. मी तर तिला मारले आणि रागाने आशा घर सोडून गेली. माई आणि घरातली माणसे नाराज होतीच. आशा बोरिवलीला राहायला गेली. म्हणून मग बरीच वर्षे आमचा संबंध जवळजवळ तुटला. नंतर काही वर्षांनी मी ऐकले की, तिने प्लेबॅक गाणे सुरू केले. आशानेसुद्धा माझ्याबरोबर माझं बाळ या सिनेमासाठी १९४३ साली गाणे म्हटले होते. पण ती गायिका होईल याची आम्हाला कोणाला कल्पना नव्हती. दोन-तीनवेळा मी तिला स्टुडिओमध्ये बघितले होते. पण ती आमच्याशी बोलायची नाही. कारण तिच्या यजमानांना ते आवडत नसे. त्याच काळात आम्ही दोघींनी पाच-सात द्वंद्व गीते गायली. पण भोसले बाहेर असल्यामुळे ती बोलायला खूप घाबरत असे. एकदा ते नव्हते आणि मी म्हटले, चल, आपण कॉफी प्यायला जाऊ. आम्ही गेलो आणि मला कळले की, आशाच्या पर्समध्ये एक आणासुद्धा नाही. मला धक्काच बसला. याचा अर्थ तिला कुठल्याही तऱ्हेचे आर्थिक स्वातंत्र्य नव्हते.

आम्हाला बाहेरून कळायचे की, आशाकडून तीन-तीन चार-चार गाणी सकाळ-संध्याकाळ गाऊन घेतली जात. बोरिवलीहून ट्रेनमधून वेगवेगळ्या स्टुडिओत संगीत दिग्दर्शकांकडे सिटिंग्जना घेऊन जाणे आणि रात्री घरी आल्यानंतर हा स्वयंपाक कर, तो स्वयंपाक कर... खरेच, आशाला त्यांनी खूपच छळले. एकदा तर मला कोरसमधल्या एका मुलीने सांगितले की, हेमंत व्हायच्या काही तास आधी ती रेकॉर्डिंगच करत होती! आम्हाला काही बोलताही येत नव्हते आणि आपण भांडून घर सोडलेय, तेव्हा आता कुठल्या तोंडाने परत येऊ, असे तिला वाटत असे. अखेर हा काळ संपला आणि आम्ही शेजारी-शेजारी घरे घेतली.

आशाच्या गाण्याबद्दल म्हणायचे तर एक म्हणजे तिच्याइतकी व्हर्सटाईल आर्टिस्ट आपल्याकडे कोणीच नाही. सुरुवातीला ती तोंड नीट न उघडता गायची. त्यामुळे तिचा आवाज आणि उच्चार अतिशय वेगळे वाटायचे. तिच्या पहिल्या तीन-चार रेकॉर्ड्स आता एकल्यात तर तुम्ही आशा भोसलेचा आवाज ओळखूच शकणार नाही. कदाचित तिला योग्य ते मार्गदर्शन मिळाले नसेल. पण आशानेच मला सांगितले की, त्यावेळी शमशाद, गीता या कश गातात हे बघून तिने आपल्य गाण्यातले दोष शोधले आणि ठरवले की, आपले गाणे बदलले पाहिजे.

त्यानंतर तिला उत्तमोत्तम संगीत दिग्दर्शकांकडे कामे मिळाली. संगीत असे आहे की, जितके जास्त तुम्ही गाता, जितक्या वेगवेगळ्या संगीत दिग्दर्शकांकडून शिकता, तेवढा तुमचा आवाज बनत जातो. अनुभव आणि आत्मविश्वास दोन्ही येतो.

मग मात्र आशाच्या आवाजात भारदस्तपणा यायला लागला. याचे श्रेय खरे म्हणजे तिच्या स्वभावाला द्यायला हवे. आपल्याला अमूक एक करता येत नाही हे ती मान्य करायला कधीच तयार नसते. आम्हा सगळ्या मंगेशकरांच्या स्वभावाचा हा एक भाग आहे. पण तिच्या बाबतीत तो जरा जास्तच आहे. शास्त्रीय संगीत शिकणारी उस्तादांच्या घराण्यातील मुसलमान मुले एखादी गोष्ट शिकायची म्हटली की, फक्त त्या गोष्टीच्या मागे लागतात. आशाचेही तसेच आहे आणि ते अजूनही कायम आहे. ती अतिशय हट्टी आहे. सर्दी, खोकला, ताप असला की मी म्हणायचे, आज नको जाऊस. ती नाही नाही म्हणे. पण अर्ध्या तासाने विचारले, आशा कुठेय की, कळायचे ती रेकॉर्डिंगला गेली. असे बरेचदा झाले आहे. मी तशी नाही. आता पन्नास लोकांसमोर आपल्याला गायला बरोबर जमले नाही तर ठीक आहे. पण उद्या पन्नास हजार लोकं ऐकतील आणि नावे ठेवतील तर? या विचाराने मी आधीच काळजी घेते. पण आशा जाते. कारण जास्त वेळ लागला तरी ती रेकॉर्डिंग उत्तम करून येते. हा हट्ट बऱ्याच लोकांच्या बाबतीत दोष आहे असे मी म्हणीन. मात्र आशाच्या बाबतीत तो खरोखरीच एक गुण आहे.

मी म्हटल्याप्रमाणे आशाला सगळ्याच तऱ्हेची गाणी चांगली गाता येतात. पण वेस्टर्न ढंगाची आणि सेमी-क्लासिकल कव्वाली ही पद्धत तिच्या आवाजाला अतिशय चपखल बसते.

आशाची बरीच मराठी गाणी गाजली आहेत. मला लावणी हा प्रकार आवडत नसला तरी 'सांगत्ये ऐका'मधले 'बुगडी माझी...' हे गाणे खूप छान आहे आणि आशा ते अप्रतिम गायली आहे. बाळची सगळीच गाणी ती छान गायली आहे, गाते. एक म्हणजे त्या सगळ्या गाण्यांमधले काव्य सुंदर आहे. दुसरे म्हणजे बाळच्या सेमी-क्लासिकल चाली आणि तिसरे म्हणजे गायकाकडून हवे ते काढून घेण्याची बाळची खुबी. मग, लता, आशा माझ्या मोठ्या बहिणी आहेत... लहान लहान गोष्टी त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा करवून घ्यायची गरज नाही, असे कधी त्याला वाटत नाही.

बाळच्या व्यतिरिक्त सुधीर फडकेंची गाणी आशा भरपूर गायली आहे. ती गाणी खूप चालली. ती गाणी खूप गोड आहेत. पण माझे असे मत आहे की, आशा ती गाणी गाताना बाबुजींची नक्कल करत असे. त्यात तिचा नाइलाज होता. कारण ते खरेच जसे पाहिजे तसे गाऊन घेत असत. पण बाबुजी स्वतः गातात तेव्हा त्या स्टाईलला त्यांचा आवाज योग्य असल्यामुळे ते गाणे गोड वाटते. वसंत प्रभू, वसंत पवार, बाळ पळसुले, श्रीनिवास खळे किंवा दत्ता डावजेकर यांच्यासाठी गाताना आशा स्वतःच्या आवाजात गायची. तशीच ती बाबुजींची गाणी गायली असती तर ती जास्त उठून आली असती. अर्थात, हे माझे स्वतःचे मत आहे, निरीक्षण आहे. कारण मी बारकाईने ऐकत असते.

हिंदी क्षेत्रात तिला दोन संगीतकार फारच भावले. ओ. पी. आणि आर. डी. जाईये आप कहाँ, ये है रेशमी जुल्फो का अंधेरा, या गाण्यांमध्ये तिच्या आवाजाचा चांगला उपयोग करून घेतला गेला आणि पंचमसाठी तिने गायलेली सगळीच गाणी उत्तम आहेत. तिसरी मंजिल या सिनेमातील सगळीच गाणी माझ्या आवडीची आहेत. याशिवाय रोशन, सलील चौधरी यांची (कठीण, वरखाली चढ-उताराची गाणी) आणि पुन्हा बाळसाठी प्रार्थना आणि लेकिन या सिनेमात ती छान गायली आहे. तसे म्हटले तर ती सगळ्या संगीत दिग्दर्शकांबरोबर गायली आहे. पण जयदेव आणि खय्याम यांच्या बरोबरची गाणी काही वेगळीच. त्यात आशाने जान ओतली आहे.

आता माझे मत आहे की, तिने थोडेसे चुझी व्हायला हवे. गाता येते आणि गाणी येतात म्हणून सगळीच गाणी गायची काही गरज नाही. मी तर ठरवलेच आहे की, चार-पाच संगीत दिग्दर्शक, ज्यांच्याबरोबर आपले पटते आणि जे बऱ्यापैकी संगीत देत आले आहेत त्यांचीच गाणी गायची. आजकाल मी बाळबरोबर मराठी कार्यक्रम करते आणि ते खूप यशस्वी झालेत. कुठल्याही कलाकाराला प्रेक्षकांची जिवंत दाद मिळणे खूप आनंददायक असते. पण मी या दोघांनाही सांगत असते की फार करू नका. नाहीतर लोक म्हणतील, हा कार्यक्रम चुकला तरी हरकत नाही. पाच दिवसांनी पुढचं आहे तो ऐकू. लोकांना हवाहवासा वाटत राहायला हवा. तरच त्याची किंमत राहते.

आशाची सहनशक्ती भरमसाट आहे. ती आम्हा सगळ्यांवर आणि मुलांवर खूप प्रेम करते आणि कधीही जरूर पडेल तेव्हा मदतीला धावून येते. आई म्हणून ती परिपूर्ण आहे आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे घरातल्या लोकांची सेवा करणे यात तिला आनंद वाटतो. संबंध दिवस रेकॉर्डिग करून आल्यानंतरही संध्याकाळी मुलांसाठी वेगवेगळे पदार्थ करायला ती तत्पर असते.

अगदी दोष काढायचेच तर मला वाटते की, आशाची कल्पनाशक्ती जरा जास्त आहे. ती उगीचच लहानसहान गोष्टी मनाला लावून घेते आणि त्यावर विचार करीत स्वतःलाच त्रास करून घेते. मग ती मूडीही आहे. तिच्या रागाचा पारा जितक्या लवकर वर जातो तितका खालीही लवकर येतो.

खरे म्हणजे, आम्ही बहिणी असल्यामुळे हे कौतुक करणेसुद्धा कोणाला खोटे वाटेल; पण आशाचे हे जे गुण-दोष मला जाणवतात ते अगदी प्रामाणिकपणे सांगितले. खरंच!

- 'फुले वेचिता' या ग्रंथाली प्रकाशनाच्या पुस्तकातून साभार

logo
marathi.freepressjournal.in