नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा झाली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. आता या चित्रपटाचा तिसरा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यातील अभिनेता सुबोध भावेच्या राजकीय व्यक्तिरेखेने लक्ष वेधून घेतले आहे. पांढरा कुर्ता, काळ्या रंगाचे बंद गळ्याचे जॅकेट आणि चेहऱ्यावरील गंभीर भाव अशा करारी अंदाजात सुबोध दिसत आहे. हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुबोध भावेच्या लूकची चर्चा
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील सुबोधचा लूक राजकीय नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आहे. पांढऱ्या कुर्त्यावर काळ्या रंगाचे बंद गळ्याचे जॅकेट, चेहऱ्यावरील गांभीर्य आणि नजरेतील करारीपणा यामुळे त्याची व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेते. या चित्रपटात तो एका महत्त्वपूर्ण राजकीय भूमिकेत दिसणार आहे.
‘मंत्री असो की आमदार असो... जो कोणी दोषी असेल, त्याला कायद्याच्या चौकटीत यायलाच लागेल. त्याची गय केली जाणार नाही,’ हा सुबोधच्या व्यक्तिरेखेचा संवादही चर्चेत आहे. या संवादातून राजकीय वर्तुळातील दोषींविरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळते. तपासाची दृश्ये, घटनास्थळाभोवती असलेले पोलिसांचे पिवळे पट्टे, पत्रकारांचे प्रश्न आणि विविध व्यक्तिरेखांच्या चेहऱ्यांवरील तणाव यांमुळे टीझरमधील रहस्य अधिक गडद होते.
टीझर पाहा
राजकारण आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कथानक
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटात राजकारण, गुन्हेगारी, सत्तेचा गैरवापर आणि न्यायासाठीचा संघर्ष अशा विषयांची मांडणी करण्यात आली आहे. सत्तेच्या पडद्याआड घडणाऱ्या कटकारस्थानांचा आणि व्यवस्थेतील गैरप्रकारांचा वेध या चित्रपटातून घेतला जाणार आहे.
या चित्रपटाचे याआधी दोन टीझर प्रदर्शित झाले होते. आता तिसरा टीझर समोर आल्याने चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि कथानकाबाबतची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात सुबोध भावेसोबत अभिनेत्री दीपाली सय्यद, उदय टिकेकर आणि अक्षय टंकसाळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक विश्वातील गुंतागुंतीचे पैलू उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
२० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत दाखल होणार
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चे दिग्दर्शन स्वरूप सावंत यांनी केले आहे. चित्रपटाची मूळ संकल्पना सागरकुमार एस. जैन यांची असून, संजय नवगिरे यांनी कथा, पटकथा आणि संवादलेखन केले आहे. आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्डच्या बॅनरखाली देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी केली आहे.
चित्रपटाचे छायाचित्रण आकाश काकडे यांनी केले असून, कलादिग्दर्शन अक्षय आंबेकर यांचे आहे. वेशभूषेची जबाबदारी अपेक्षा गांधी सोनी यांनी सांभाळली आहे. नेहा घोडके यांनी प्रॉडक्शन कंट्रोलर, सचिन घनवट यांनी प्रॉडक्शन हेड, यश सणस यांनी लाईन प्रोड्युसर आणि विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे. हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.