
मुंबई : प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे आज सकाळी पवईतील हिरानंदानी रुग्णालयात निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते आणि अखेर आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
गायकवाड यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत सात वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावत आपली कलात्मकता सिद्ध केली होती. ‘बालगंधर्व’, ‘उरी’, ‘दंगल’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘पानिपत’, ‘संजू’, ‘सुपर ३०’, काशिनाथ घाणेकर, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी रंगभूषाकार म्हणून भरीव कामगिरी बजावली. त्यांच्या अद्वितीय मेकअप शैलीमुळे प्रेक्षकांना अनेक ऐतिहासिक व काल्पनिक व्यक्तिरेखा जिवंत असल्याचा अनुभव आला.
कोरोना काळात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्यानंतर त्यांचे आरोग्य बिघडत गेले. अखेर याच दीर्घ आजारातून त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज संध्याकाळी ४:३० वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना आणि मुलगी तन्वी असा परिवार आहे.
त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मंत्री आशिष शेलार यांनी, "एक संवेदनशील आणि कुशल कलाकार हरपला," अशी भावना व्यक्त केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, "रुपेरी पडद्यावर व्यक्तिरेखा जिवंत करणारा जादुगार हरपला," अशा शब्दांत शोक व्यक्त केला.