अभिनेत्री मधु कांबीकर यांचे पुण्यात निधन; मराठी चित्रपटसृष्टीसह लावणी, रंगभूमीच्या क्षेत्रावर शोककळा

मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि लोककलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास पुण्यातील शास्त्रीनगर, येरवडा येथील राहत्या घरी निधन झाले.
अभिनेत्री मधु कांबीकर यांचे पुण्यात निधन; मराठी चित्रपटसृष्टीसह लावणी, रंगभूमीच्या क्षेत्रावर शोककळा
अभिनेत्री मधु कांबीकर यांचे पुण्यात निधन; मराठी चित्रपटसृष्टीसह लावणी, रंगभूमीच्या क्षेत्रावर शोककळा (Photo-X)
Published on: 

पुणे : मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि लोककलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास पुण्यातील शास्त्रीनगर, येरवडा येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वातील एका अष्टपैलू कलावंताचा प्रवास थांबला असून, चित्रपटसृष्टीसह लावणी आणि रंगभूमीच्या क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

मधु कांबीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सायंकाळी चार वाजेपर्यंत शास्त्रीनगर, येरवडा येथे ठेवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे मानलेले बंधू शाहीर दादा पासलकर यांनी दिली.

अभिनेत्री मधु कांबीकर यांचे पुण्यात निधन; मराठी चित्रपटसृष्टीसह लावणी, रंगभूमीच्या क्षेत्रावर शोककळा
नानापर्व निमाले! मराठी, हिंदी नाट्य-चित्रपटसृष्टीचा अष्टपैलू अभिनेता नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड

नृत्य करताना कोसळल्या अन् प्रकृती ढासळली

मराठी रंगभूमीशी संबंधित एका कार्यक्रमात २०१६ मध्ये नृत्य सादर करत असताना मधू कांबीकर यांना अचानक चक्कर आली आणि त्या कोसळल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित अशी सुधारणा झाली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्या गंभीर आरोग्यसमस्यांचा सामना करत होत्या, अशी माहिती शाहीर दादा पासलकर यांनी दिली.

‘शापित’ चित्रपटातून मिळाली विशेष ओळख

मधू कांबीकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारत मराठी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केले. राजदत्त दिग्दर्शित ‘शापित’ या चित्रपटामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. त्यानंतर ‘राघू मैना’, ‘हेच माझं माहेर’, ‘एक होता विदूषक’, ‘रावसाहेब’, ‘झपाटलेला’, ‘झपाटलेला २’, ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’, ‘मला घेऊन चला’, ‘येऊ का घरात’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘धोंडी धोंडी पाणी दे’, ‘डेबू’, ‘संत गाडगे महाराज’, ‘संघर्ष जीवनाचा’ आणि ‘आभ्राण’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

अभिनेत्री मधु कांबीकर यांचे पुण्यात निधन; मराठी चित्रपटसृष्टीसह लावणी, रंगभूमीच्या क्षेत्रावर शोककळा
Madhu Kambikar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री अन् लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

अभिनयकौशल्य केले सिद्ध

विशेषतः ‘एक होता विदूषक’मधील त्यांची भूमिका, ‘झपाटलेला’मधील लक्ष्याच्या आईची व्यक्तिरेखा आणि ‘डेबू’ चित्रपटातील संत गाडगे महाराज यांच्या आईची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. गंभीर, भावनिक तसेच विनोदी आशयाच्या भूमिकांमध्येही त्यांनी आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले.

हिंदी, गुजराती चित्रपटांतही उमटवला ठसा

मधू कांबीकर यांनी केवळ मराठी चित्रपटांपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी काम केले. ‘हम दोनों’, ‘सातवाँ आसमान’, ‘अपनापन’, ‘यशवंत’ आणि ‘शोला और शबनम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. गुजराती चित्रपट ‘साद’मधील त्यांच्या अभिनयाचेही कौतुक झाले.

पुरस्कारांनी गौरवलेली कारकीर्द

मधू कांबीकर यांना त्यांच्या अष्टपैलू अभिनयासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य चित्रपट पुरस्कारांसह विविध सन्मानांनी गौरवण्यात आले. ‘हेच माझं माहेर’, ‘रावसाहेब’, ‘आई तुळजाभवानी’ आणि ‘संघर्ष जीवनाचा’ या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला विशेष दाद मिळाली. गुजराती चित्रपट ‘साद’मधील अभिनयासाठीही त्यांना पुरस्कार मिळाला होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in