

सध्या सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये १७ मे रोजी मराठमोळ्या संस्कृतीचा आणि पारंपरिक फॅशनचा खास जलवा पाहायला मिळाला. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि डिजिटल क्रिएटर्सनी पारंपरिक वेशभूषेत रेड कार्पेटवर हजेरी लावत महाराष्ट्राची संस्कृती जागतिक मंचावर झळकवली.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सोहळ्यात मराठी कलाकारांच्या उपस्थितीचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी, यूट्यूबर अंकिता वालावलकर, पॉडकास्टर जयंती वाघधरे आणि दिग्दर्शक केदार जोशी हे देखील कान्समध्ये उपस्थित होते.
या सर्व कलाकारांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखात रेड कार्पेटवर केलेल्या आकर्षक उपस्थितीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून, चाहत्यांकडून त्यांच्या लूकचे कौतुक केले जात आहे.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा एलिगंट लूक
७८ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आयव्हरी रंगाचा सूट आणि क्लासिक ब्लॅक ट्राऊझर्समध्ये रुबाबदार दिसत होते. त्यांनी आपला लूक साधा, एलिगंट ठेवला होता.
निवेदिता सराफ यांनी फ्लोरल प्रिंटेड साडी आणि जरीवर्क शाल परिधान करून रॉयल आणि पारंपरिक अंदाज सादर केला.
प्राजक्ता माळीच्या नऊवारी लूकचं सोशल मीडियावर कौतुक
सर्व सेलिब्रिटी लूकमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या पारंपरिक अवताराने विशेष लक्ष वेधले. प्राजक्ताने आकाशी रंगाची नऊवारी साडी परिधान करत मराठमोळ्या संस्कृतीचा सुंदर आविष्कार सादर केला.जांभळ्या रंगाचा ब्लाऊज आणि तसाच शेला तिच्या रूपाची शोभा वाढवत होता. तिने महाराष्ट्रीयन नथ, ठुशी, चंद्रकोर टिकली आणि आकर्षक कंबरपट्टा, बाजूबंद असे पारंपरिक दागिने परिधान केले होते.
कान्समधील इंडियन पॅव्हेलियन कार्यक्रमात यापूर्वी तिने परिधान केलेल्या ऑफ-शोल्डर रेड गाऊनवरून सोशल मीडियावर टीका झाली होती.
मात्र, तिच्या नव्या पारंपरिक लूकने मराठी संस्कृतीचा जागतिक मंचावर सुंदर सन्मान केल्याबद्दल चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले.
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरचाही खास अंदाज
'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी कंटेंट क्रिएटर अंकिता वालावलकर हिनेही आपल्या खास स्टाईलिंगमधून मराठमोळा ठसा उमटवला. तिने पारंपरिक पैठणी साडी आणि स्लीव्हलेस स्ट्रॅपी ब्लाऊज परिधान केला होता. व्हाईट मोत्याचे दागिने तिच्या लुकला शोभून दिसत होते.
विशेष म्हणजे, तिने साडीचा पदर पाठीमागे अशा पद्धतीने स्टाईल केला होता की त्यावरील कोकण-प्रेरित एम्ब्रॉयडरी स्पष्टपणे दिसत होती. या लूकमधून तिने कोकण आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रती अभिमान व्यक्त केला.
सोशल मीडियावर मराठी संस्कृतीचं कौतुक
कान्समधील या मराठी कलाकारांच्या उपस्थितीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्समध्ये मराठी परंपरा, हस्तकला आणि प्रादेशिक ओळख अभिमानाने सादर केल्याबद्दल अनेकांनी कलाकारांचे कौतुक केले.