पुदुचेरीच्या फॅशन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध मॉडेल आणि 2021 ची 'मिस पुदुचेरी' सॅन रेचेल हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्णभेदाविरोधात आवाज उठवणारी आणि आपल्या ठाम विचारांसाठी ओळखली जाणारी सॅनने केवळ 25व्या वर्षी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेत आपलं आयुष्य संपवलं.
तिला तत्काळ जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिला वाचवण्यात अपयश आलं. तिच्या निधनानंतर पुदुचेरीतील मॉडेलिंग विश्वासह सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
काळ्या रंगावर अभिमान — वर्णद्वेषाला ठाम विरोध
सॅन रेचेलचं मूळ नाव शंकर प्रिया होतं. लहानपणीच मातृछाया हरपलेल्या सॅनचा सांभाळ तिच्या वडिलांनी केला आणि तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीसाठीही त्यांनीच पाठबळ दिलं. इंडस्ट्रीत पाय रोवताना तिला तिच्या त्वचेच्या काळ्या रंगामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, पण तिने हार मानली नाही.
2019 मध्ये तिने मिस डार्क क्वीन तामिळनाडू, आणि 2021 मध्ये मिस पुदुचेरीचा किताब पटकावत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. लंडन, फ्रान्स, जर्मनी अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांतही तिने सहभाग घेतला होता. महिलांच्या सुरक्षेसाठी तिने जागरूकतेचं काम केलं होतं.
नैराश्य आणि आत्महत्येचं दाट सावट
मिळालेल्या माहितीनुसार, सॅन रेचेल काही काळापासून नैराश्याने ग्रासलेली होती. अलीकडेच तिचं लग्न झालं होतं. 5 जुलै रोजी झोपेच्या गोळ्यांचं अधिक प्रमाणात सेवन केल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला तात्काळ शासकीय रुग्णालयात नेलं. त्यानंतर तिला खासगी हॉस्पिटलमध्ये आणि नंतर JIPMER मध्ये हलवण्यात आलं. अखेर शनिवारी तिचा मृत्यू झाला.
उरलैयनपेट्टई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. तिच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट आढळून आली नाही, त्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.