मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व मोहनलाल यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (दि. २१) अधिकृतरीत्या ही घोषणा केली.
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!
Published on

मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व मोहनलाल यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (दि. २१) अधिकृतरीत्या ही घोषणा केली. २०२३ साठीचा हा पुरस्कार त्यांना २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने X अकाउंटवर पोस्ट करत म्हटले, “मोहनलाल यांचा चार दशकांहून अधिक काळ चाललेला चित्रपट प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. ते एक महान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते असून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.”

मोहनलाल यांनी आपल्या बहुमुखी अभिनयाने मल्याळमपुरतेच नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करताना त्यांनी अ‍ॅक्शन, कॉमेडी, रोमँस ते सामाजिक विषयांवरील भूमिका सहजतेने साकारल्या. त्यांच्या नावावर ५ राष्ट्रीय पुरस्कार, ९ राज्य पुरस्कार, तसेच पद्मभूषण आणि पद्मश्री यांसारखे उच्च सन्मान आहेत.

या घोषणेनंतर देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सोशल मीडियावरून मोहनलाल यांना शुभेच्छा दिल्या. मोदींनी लिहिले की, ''मोहनलाल उत्कृष्टता आणि बहुमुखी प्रतिभेचे प्रतीक आहेत. दशकांपासून त्यांच्या समृद्ध कार्यामुळे, ते मल्याळम चित्रपट, नाट्यसृष्टीतील एक अग्रणी आहेत आणि केरळच्या संस्कृतीबद्दल त्यांना खूप प्रेम आहे. त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध माध्यमांमध्ये त्यांची सिनेमॅटिक आणि नाट्यमय प्रतिभा खरोखरच प्रेरणादायी आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांची कामगिरी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहो.''

logo
marathi.freepressjournal.in