बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकुर पुन्हा आपल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी बिपाशा बसूविषयी आक्षेपाहार्य टिप्पणी करतानाच तिचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे मृणाल चांगलीच ट्रोल झाली होती. त्यानंतर तिने बिपाशाची माफी देखील मागितली. हे प्रकरण शांत होत नाही तोवर मृणालचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिने अनुष्काविषयी कमेंट केल्याचा चाहत्यांचा अंदाज आहे. यावरूनच सध्या मृणाल पुन्हा एकदा ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये मृणाल नेमकं काय म्हणाली?
मृणालचा हा व्हिडिओ रेडिटवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये तिला एका मुलाखतीदरम्यान त्या चित्रपटांविषयी विचारण्यात येते जे तिने नाकारले. पण पुढे जाऊन ते चित्रपट हिट झाले. यावर मृणाल म्हणते, "असे अनेक चित्रपट आहेत." ती पुढे म्हणते, "मी त्यावेळी नाही म्हंटलं कारण मी तयार नव्हते." कॉंट्रोवर्सी होईल असे म्हणून नाव घेणं टाळत, ती म्हणाली, " ती एक सुपरहिट फिल्म होती. त्यामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला खूप प्रसिद्धी देखील मिळाली. पण मला असं वाटलं की, त्यावेळी जर मी ते काम केलं असतं तर मी स्वतःला हरवून बसले असते. ती अभिनेत्री आता काम करत नाहीये. पण मी करतेय. हा माझा विजय आहे. कारण क्षणार्धात मिळालेले यश दीर्घकाळ टिकत नाही."
मृणालला मिळालेली ‘सुलतान’ चित्रपटाची ऑफर
मृणालने जरी थेट नाव घेतले नसेल, तरी लोकांनी अंदाज लावला की तिचा इशारा अनुष्का शर्मा आणि ‘सुल्तान’ चित्रपटाकडे होता.
खरं म्हणजे, बिग बॉस 15 मध्ये मृणाल आपल्या ‘जर्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती, तेव्हा सलमान खानने सांगितले होते की ‘सुलतान’साठी सुरुवातीला मृणालला घेण्याचा विचार होता.
तिच्या या व्हायरल व्हिडिओखाली सोशल मीडियावर युजर्सनी मृणाल ठाकुरला जोरदार ट्रोल केले आहे. अनेकांनी म्हटले की, इतरांना कमी दाखवणे आणि स्वतःचे कौतुक करणे हे मृणालचा पॅटर्न आहे. बिपाशाबद्दल जे काही तिने म्हटले, ते ‘ती लहान होती’ म्हणून माफ केले गेले, पण आता अलीकडील इंटरव्यूमध्ये तीच गोष्ट पुन्हा चर्चेत आली आहे. या प्रतिक्रियांमुळे मृणाल चांगलीच ट्रोल झाली आहे.