“फोनवर बोलायचं असेल तर तुम्हीच नाटक करा!”; रंगमंचावर आस्ताद काळेचा संताप, चालू प्रयोग थांबवत प्रेक्षकाला सुनावलं

नाटकाच्या प्रयोगादरम्यान अभिनेता आस्ताद काळेने मोबाईलवर मोठ्याने बोलणाऱ्या एका प्रेक्षकाला रंगमंचावरून सुनावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे रंगभूमीवरील शिस्त आणि प्रेक्षकांच्या जबाबदारीबाबत पुन्हा चर्चा रंगली आहे.
“फोनवर बोलायचं असेल तर तुम्हीच नाटक करा!”; रंगमंचावर आस्ताद काळेचा संताप, चालू प्रयोग थांबवत प्रेक्षकाला सुनावलं
“फोनवर बोलायचं असेल तर तुम्हीच नाटक करा!”; रंगमंचावर आस्ताद काळेचा संताप, चालू प्रयोग थांबवत प्रेक्षकाला सुनावलं
Published on

मुंबईतील माटुंगा परिसरातील यशवंत नाट्य मंदिरात सुरू असलेल्या नाटकादरम्यान अभिनेता आस्ताद काळेने एका प्रेक्षकाला रंगमंचावरून सुनावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाच्या प्रयोगावेळी घडलेल्या या घटनेमुळे रंगभूमीवरील शिस्त आणि प्रेक्षकांच्या जबाबदारीबाबत पुन्हा चर्चा रंगली आहे.

इमोशनल सीनदरम्यान व्यत्यय

नाटक सुरू असताना प्रेक्षकांपैकी एक जण मोबाईल फोनवर मोठ्याने बोलू लागल्याने सभागृहात व्यत्यय निर्माण झाला. हा प्रसंग इमोशनल सीनदरम्यान घडल्याने आस्ताद काळेची लिंक तुटली. त्यानंतर आस्ताद काळेने काही क्षण प्रयोग थांबवत थेट त्या प्रेक्षकाला उद्देशून प्रतिक्रिया दिली. "जर फोनवरच बोलायचं असेल, तर आम्ही तुमची भूमिका करतो... तुम्ही इथे येऊन अभिनय करा," अशा शब्दांत आस्ताद काळेने संताप व्यक्त केला.

प्रेक्षकांमध्ये चर्चा, संमिश्र प्रतिक्रिया

या अनपेक्षित घटनेमुळे काही काळ नाटक थांबले. त्यानंतर उपस्थित प्रेक्षकांमध्येही या प्रकारावर चर्चा सुरू झाली. काहींनी कलाकारांच्या मेहनतीचा आदर राखण्यासाठी अशा प्रकारांना आळा बसायला हवा, असे मत व्यक्त केले; तर काहींनी सार्वजनिकरित्या अशा प्रकारे सुनावणे योग्य होते का, यावर प्रश्न उपस्थित केले.

माफी मागून पुन्हा प्रयोग सुरू

दरम्यान, प्रयोग मध्येच थांबवल्याची जाणीव होताच आस्ताद काळेने प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली. नाटकात व्यत्यय आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्याने पुन्हा प्रयोग सुरळीतपणे सुरू केला.

रंगभूमीवरील शिस्तीचा प्रश्न पुन्हा चर्चेत

या घटनेनंतर रंगमंचावरील सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांनी शिस्त पाळण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. चित्रपट किंवा दूरदर्शनप्रमाणे रंगभूमीवर पुन्हा टेक घेण्याची संधी नसते. त्यामुळे मोबाईलचा आवाज, रिंगटोन किंवा मोठ्याने बोलणे यांसारखे लहान व्यत्ययही कलाकारांच्या एकाग्रतेवर थेट परिणाम करू शकतात.

प्रयोग सुरू असताना मोबाईल सायलेंट ठेवावा आणि कोणताही व्यत्यय आणू नये, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. तरीही अशा घटना घडत असल्याने रंगभूमीवरील शिस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in