

आज महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असताना, शहरात लोकशाहीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर नागरिकांसह सेलेब्रिटीही मतदानासाठी पोहोचले. अशाच वातावरणात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्याहून मुंबईपर्यंत प्रवास करत मतदानाचा हक्क बजावला.
मतदान म्हणजे केवळ अधिकार नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाची खूण आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्याहून मुंबईपर्यंत ३ ते ४ तासांचा प्रवास करत मतदानाचा हक्क बजावला. ते म्हणाले, "मी मतदान मुंबईत करतो. सध्या मी पुण्यात राहतो. आज सकाळी ६ वाजता निघालो, इथे आलो आणि मतदान केलं. मला असं वाटतं की मतदान करणं म्हणजे आपल्या अस्तित्वाची खूण आहे आणि ते प्रत्येकाने जाणीवपूर्वक केलं पाहिजे. जो उमेदवार योग्य वाटेल त्यालाच मत द्या, पण घराबाहेर जरूर पडा. सुट्टी आहे म्हणून घराबाहेर राहू नका.. कृपया बाहेर पडा आणि मतदान करा.
नाना पाटेकरांसह अनेक मराठी कलाकारांनीही आज मतदान केंद्रावर हजेरी लावत नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली.