
अभिनेता, गीतकार आणि गायक पियुष मिश्रा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओत ते थेट आपल्या दिग्दर्शक अनुराग कश्यपचीच टर उडवत आहेत. "अनुराग चांगले चित्रपट बनवतो, पण दूसरा भाग मुद्दाम बिघडवतो. त्याला हे करण्यातच मजा येते," असे पियुष मिश्रा या व्हिडिओ मध्ये म्हणताना दिसत आहेत.
‘ह्यूमन्स ऑफ सिनेमा’ या यूट्यूब चॅनलवरील खास चर्चेत पियुष मिश्रा, मनोज बाजपेयी, रंजन सिंग, ‘जुगनुमा’चे दिग्दर्शक राम रेड्डी आणि स्वतः अनुराग कश्यप उपस्थित होते. त्यावेळी पियुषना विचारलं गेलं की, ‘गुलाल’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपुर’ पुन्हा पाहतोस का? त्यावर पियुष म्हणाले, "गँग्स ऑफ वासेपुर ठीक आहे. पण गुलाल... माफ कर अनुराग, या चित्रपटाचा पहिला भाग मस्त होता, पण नंतर पूर्ण चित्रपटाची वाट लावली." ते पुढे म्हणाले, याची समस्या अशी आहे की, अर्धा चित्रपट छान बनवतो, आणि नंतर वाटतं की खूपच चांगला होतोय म्हणून दुसरा भाग बिघडवून बघतो. हे तो सगळ्याच चित्रपटांमध्ये करतो. सवयच आहे ही त्याची.
रेडिटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत मिश्रा यांनी ‘देव डी’चित्रपटाबद्दलही अशीच नाराजी व्यक्त केली. "या चित्रपटाचाही पहिला भाग क्लासिक होता, पण नंतर सगळं कोलमडलं,” असं ते म्हणाले. त्यांच्या या रोखठोक विधानांमुळे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान अनुराग कश्यप सध्या आपल्या आगामी चित्रपट 'निशानची'च्या रिलीजची तयारी करत आहे. या चित्रपटातून बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे अभिनेता म्हणून पदार्पण करत असून त्याच्यासोबत अभिनेत्री वेदिका पिंटोही झळकणार आहे.