
तमिळ सुपरस्टार आणि राजकारणी थलपती विजयविरुद्ध चेन्नई पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर मुस्लीम समुदायाचा अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तमिळनाडू सुन्नत जमातच्यावतीने थलपती विजयविरुद्ध चेन्नई पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
अलिकडेच थलपती विजयने रमजान महिन्याच्या सुरुवातीला इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी त्याने मुस्लिम समुदायासोबत इफ्तार पार्टी केली आणि स्वतः देखील एक दिवसाचा रोजा ठेवला होता. या इफ्तार पार्टीमधील विजयचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. पण याच पार्टीत इफ्तारदरम्यान विजयने मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इफ्तारमध्ये काही असे लोक उपस्थित होते ज्यांचा रोजा किंवा इस्लामिक पद्धतींशी कोणताही संबंध नव्हता. यामध्ये मद्यपी आणि गुंडांचाही समावेश होता. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या पावित्र्याचा अवमान झाला आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे, असा आरोप सुन्नत जमातच्यावतीने थलपती विजयविरुद्ध करण्यात आला आहे.