मराठमोळा रिल स्टार प्रथमेश कदमचं निधन; माय-लेकाची लोकप्रिय जोडी कायमची हरपली

सोशल मीडियावर हसत-खेळत दिसणारा, आईसोबत साध्या आयुष्यातले क्षण मांडणारा मराठमोळा रिल स्टार आणि कंटेट क्रिएटर प्रथमेश कदम याचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाने सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, अनेक कलाकार आणि कंटेट क्रिएटर्सनी शोक व्यक्त केला आहे.
मराठमोळा रिल स्टार प्रथमेश कदमचं निधन; माय-लेकाची लोकप्रिय जोडी कायमची हरपली
Published on

सोशल मीडियावर हसत-खेळत दिसणारा, आईसोबत साध्या आयुष्यातले क्षण मांडणारा मराठमोळा रिल स्टार आणि कंटेट क्रिएटर प्रथमेश कदम याचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाने सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, अनेक कलाकार आणि कंटेट क्रिएटर्सनी शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश गेल्या काही काळापासून आजारी होता. त्याच्या निधनाची माहिती त्याच्या जवळच्या मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. प्रथमेशचा मित्र आणि कंटेट क्रिएटर तन्मय पाटेकर याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं, "तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश. देवाघरी स्वतःची काळजी घे रे! खूप आठवण येईल तुझी." या पोस्टनंतर अनेक कलाकार आणि कंटेट क्रिएटर्सनी सोशल मीडियावरून प्रथमेशला श्रद्धांजली वाहिली.

माय-लेकाची जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय

प्रथमेश कदम आणि त्याची आई प्रज्ञा कदम या माय-लेकाची जोडी सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय होती. दोघांचे रिल्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत होते. साधे संवाद, घरगुती वातावरण आणि नैसर्गिक अभिनयामुळे ही जोडी अनेक मराठी कलाकारांनाही भावली होती.

काही वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचे निधन झाले होते. त्या दुःखानंतर कुटुंबाची जबाबदारी प्रथमेशवर आली होती. आईला सावरण्यासाठी आणि स्वतःच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्याने रिल्स बनवायला सुरुवात केली होती.

काही मीडिया रिपोर्टनुसार, आजारपणाच्या काळातही प्रथमेश सोशल मीडियावर सक्रिय होता. काही महिन्यांपूर्वी त्याने रुग्णालयातून शूट केलेले रिल्सही पोस्ट केले होते. सध्या प्रथमेशचे इंस्टाग्रामवर सुमारे दोन लाख फॉलोअर्स होते, तर त्याच्या आईच्या अकाउंटवर ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

प्रथमेशने रिल्ससोबतच म्युझिक अल्बम आणि इतर कंटेट क्रिएटर्ससोबत कोलॅबोरेशन व्हिडीओमधूनही आपली ओळख निर्माण केली होती. साधा, प्रेमळ स्वभाव आणि डान्स टॅलेंट यामुळे त्याने अल्पावधीत अनेकांची मनं जिंकली होती.

logo
marathi.freepressjournal.in