मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी व हिंदी मालिकांमधून घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचे आज (दि. ३१) पहाटे निधन झाले. प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. मध्यंतरी ती बरीही झाली होती. पुन्हा तिला कर्करोगाचा त्रास सुरू झाला. आज अखेर ३८ व्या वर्षी तिने मीरारोड येथे निवासस्थानी शेवटचा श्वास घेतला.
मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Published on

मराठी व हिंदी मालिकांमधून घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचे आज (दि. ३१) पहाटे निधन झाले. प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. मध्यंतरी ती बरीही झाली होती. पुन्हा तिला कर्करोगाचा त्रास सुरू झाला. आज अखेर ३८ व्या वर्षी तिने मीरारोड येथे निवासस्थानी शेवटचा श्वास घेतला.

आज दुपारी ४ वाजता मीरारोड येथील हिंदू स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तिच्या अकाली निधनाने मराठी तसेच हिंदी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

छोट्या भूमिकेतून कारकिर्दीला सुरुवात

ठाणे येथे २३ एप्रिल १९८७ रोजी जन्मलेल्या प्रियाने महाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमधून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. २००५ मध्ये ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करताच तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या प्रभावी भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. विशेषतः निगेटिव्ह शेड्स असलेल्या भूमिकांमध्ये प्रियाने आपली वेगळी छाप पाडली.

हिंदी मालिकांमधील यश

मराठीसोबतच हिंदी टेलिव्हिजनमध्येही प्रिया तितकीच यशस्वी ठरली. ‘कसम से’ या मालिकेतून हिंदी मालिकांमध्ये प्रवेश केल्यानंतर ‘पवित्र रिश्ता’ मधील वर्षा, तसेच ‘बडे अच्छे लगते हैं’ मधील ज्योती माल्होत्रा अशा भूमिकांनी ती लोकप्रिय झाली.

कर्करोगाशी शेवटची लढाई

काही वर्षांपूर्वी तिला कर्करोगाचे निदान झाले होते. उपचारानंतर ती बरीही झाली. त्यावेळी तिने परदेशात नाट्यदौरेही केले. मात्र, अलीकडे पुन्हा आजार बळावल्याने तिच्या प्रकृतीत बिघाड झाला. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले उपचार अपयशी ठरले आणि आज सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला.

प्रियाच्या निधनाने सहकलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. छोट्या पडद्यावरील गुणी अभिनेत्री म्हणून तिची आठवण सदैव राहील.

logo
marathi.freepressjournal.in