

मराठी सिनेसृष्टीत २०२५ मध्ये रिलीज झालेल्या 'दशावतार' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. कोकणच्या निसर्गसौंदर्याने, तिथल्या संस्कृतीने आणि परंपरेने रंगलेला हा सिनेमा फक्त मनोरंजनापुरता नाही तर प्रेक्षकांना एक मोठा संदेश देणारा ठरला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही जोरदार कमाई केली आणि आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे ती या चित्रपटाच्या सिक्वेलची. यासाठी प्रेक्षक दिग्दर्शकांकडे मागणीही करत आहे.
मी एका पायावर काय एका अंगठ्यावर तयार
या चित्रपटात वंदनाची भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने नुकतीच ‘नवशक्ति’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना, चित्रपटाचा सिक्वेल आल्यास त्यामध्ये काम करण्यास एका पायावर काय एका अंगठ्यावरही तयार असल्याचे ती म्हणाली.
"अनेक प्रेक्षक चित्रपटाचा दुसरा भाग यावा असे म्हणत आहेत, माझीही खूप इच्छा आहे. एका वाक्यावरून अनेकजण मेसेज करत आहेत. बाबुली काका सांगून जातायेत की...भैरवीची वेळ झाली...आता पुढची जबाबदारी तुझी… तू हा लढा पुढे चालव...यावरून चित्रपटाचा भाग २ आल्यास वंदना असेल त्यामध्ये असा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत", असे ती म्हणाली. पुढे बोलताना, सिनेमाच्या दुसऱ्या भागात काम करण्यास एका पायावर नव्हे तर अंगठ्यावर देखील तयार असल्याचा पुनरुच्चार तिने केला. या विधानामुळे चाहत्यांमध्ये ‘दशावतार २’साठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी हाफ मॅड बाबुलीची भूमिका अत्यंत उत्कृष्ठ पद्धतीने साकारली आहे. त्यांचा अभिनय नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. त्याशिवाय महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांसारखे कलाकारही सिनेमात अप्रतिम भूमिका साकारताना दिसतात.
‘दशावतार’ने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातही आपली छाप सोडली आहे. सातासमुद्रापारही सिनेमाचे शोज झाले आणि प्रेक्षकांनी या सिनेमाचे भरभरून कौतुक झाले.