पुण्यात रंगणार 'राडा २०२६'; महाराष्ट्राचा पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल, तरुणांसाठी मोठं व्यासपीठ

पुण्यात २८-२९ मार्च रोजी 'राडा २०२६' हा महाराष्ट्राचा पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल रंगणार आहे. अवधूत गुप्ते, प्राजक्ता कोळी यांसह अनेक कलाकारांची उपस्थिती यामध्ये असणार आहे. जाणून घ्या या फेस्टिव्हलची सविस्तर माहिती.
पुण्यात रंगणार 'राडा २०२६'; महाराष्ट्राचा पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल, तरुणांसाठी मोठं व्यासपीठ
पुण्यात रंगणार 'राडा २०२६'; महाराष्ट्राचा पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल, तरुणांसाठी मोठं व्यासपीठ
Published on

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात नवा अध्याय लिहित 'राडा २०२६' हा राज्यातील पहिलाच मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल पुण्यात रंगणार आहे. भाडीपा (भारतीय डिजिटल पार्टी) प्रस्तुत हा दोन दिवसीय उत्सव २८ आणि २९ मार्च २०२६ रोजी बालेवाडी येथील 'द ऑर्किड हॉटेलमध्ये प्रथमच आयोजित करण्यात येत आहे.

मराठी टॅलेंटला मिळणार व्यासपीठ

मराठी कलाकार, कॉमेडियन आणि डिजिटल क्रिएटर्स जागतिक स्तरावर आपली छाप पाडत असताना त्यांच्या कामाचा उत्सव साजरा करण्यासाठी 'राडा' हे खास व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. "मराठी तरुणांसाठी, त्यांच्याचद्वारे आणि त्यांच्यासाठी" हा या फेस्टिव्हलचा मुख्य हेतू आहे.

नामांकित कलाकारांची उपस्थिती

या फेस्टिव्हलमध्ये अवधूत गुप्ते, प्राजक्ता कोळी, डीजे क्रेटेक्स, यंग डीएसए, सृष्टी तावडे, यशराज मुखाटे आणि नील साळेकर यांसारख्या लोकप्रिय कलाकारांचा सहभाग असणार आहे. तसेच 'कास्टिंग काउच' फेम अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांचीही उपस्थिती असणार आहे.

'मराठी इंटरनेट'चा प्रत्यक्ष अनुभव

या उत्सवात मोठ्या स्टेजवरील परफॉर्मन्सेस, लाईव्ह अ‍ॅक्ट्स आणि विचारमंथनात्मक चर्चांद्वारे मराठी डिजिटल विश्वाचा अनुभव प्रत्यक्ष घेता येणार आहे. कलाकार आणि चाहत्यांना एकाच मंचावर संवाद साधण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

आयोजकांची प्रतिक्रिया

भाडीपाचे सह-संस्थापक सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन यांनी सांगितले की, "जग आता मराठी टॅलेंटकडे लक्ष देत आहे. पण आपल्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याकडे व्यासपीठ नव्हते. राडा हाच तो प्रयत्न आहे, जो आपल्या संस्कृती घडवणाऱ्या लोकांना एकत्र आणतो. आपल्या मातीतून उगवलेल्या पॉप कल्चरला पुढे नेणाऱ्या या चळवळीचा भाग होणे खूपच खास आहे आणि यासाठी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यापेक्षा योग्य ठिकाण कोणते?"

पुणे ठरलं केंद्रबिंदू

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात हा फेस्टिव्हल होत असल्याने मराठी पॉप कल्चरला नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मराठी पॉप कल्चरला जागतिक स्तरावर नेण्यासाठी 'राडा २०२६' हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे चित्र आहे.

logo
marathi.freepressjournal.in