

बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी व अभिनेत्री पत्रलेखा यांनी दोन महिन्यांनंतर आपल्या लाडक्या लेकीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. याचसोबत त्यांनी आपल्या गोड मुलीचे नावही अधिकृतपणे जाहीर केले आहे. १८ जानेवारी रोजी या दाम्पत्याने सोशल मीडियावर ही खास पोस्ट शेअर केली.
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बाळाचा चेहरा दाखवलेला नसला तरी, आई-वडिलांच्या हातात घट्ट पकडलेला तिचा छोटासा हात दिसतो. या सुंदर फोटोसोबत त्यांनी लिहिले आहे, "हात जोडून आणि मनःपूर्वक, आम्ही आम्हाला मिळालेल्या सर्वात मोठ्या आशीर्वादाची ओळख करून देतो - पार्वती पॉल राव". याच पोस्टमधून त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘पार्वती पॉल राव’ असल्याचे जाहीर केले.
देवी पार्वतीच्या नावावरून ठेवलेले हे नाव शक्ती, करुणा आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. ‘पॉल’ आणि ‘राव’ ही अनुक्रमे पत्रलेखा आणि राजकुमार यांची आडनावे असून, नावामध्ये दोघांची ओळख जपली गेली आहे. नाव जाहीर होताच चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
नाव जाहीर होताच फॅन्स आणि इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोनाक्षी सिन्हा, भूमी पेडणेकर आणि इतर कलाकारांनी कमेंट करून जोडप्याचे अभिनंदन केले.
विशेष म्हणजे, राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी १५ नोव्हेंबर २०२५ रोजी, त्यांच्या चौथ्या लग्नवाढदिवशीच कन्यारत्नाचे स्वागत केले होते. त्या वेळी सोशल मीडियावर त्यांनी ही आनंदाची बातमी शेअर करत, ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट असल्याचे सांगितले होते.
राजकुमार आणि पत्रलेखाची ओळख २०१४ मध्ये ‘सिटी लाइट्स’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये राजकुमारने पत्रलेखाला लग्नासाठी प्रपोज केले आणि त्याच वर्षी १५ नोव्हेंबरला चंदीगड येथे दोघांचा विवाहसोहळा पार पडला.