

साऊथची लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या शाही विवाहसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असताना विशेष लक्ष वेधून घेतला तो त्यांच्या वेडिंग लूकने. आता या आऊटफिटमागची खास कल्पना समोर आली आहे.
अनामिका खन्ना यांनी डिझाइन केले पोशाख
या दोघांच्या लग्नासाठीचे पोशाख प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केले होते. नुकत्याच हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या आऊटफिटमागील संकल्पना उलगडली. त्यांच्या मते, विजय आणि रश्मिका यांची प्रेमकथा कपड्यांमध्ये वेगळी दाखवण्याची गरज भासली नाही, कारण त्यांच्यातील नातं नैसर्गिकपणे जाणवत होतं. पहिल्याच भेटीत ही जोडी अत्यंत खरी आणि सहज वाटल्याचं त्यांनी सांगितलं.
रश्मिकाच्या लूकमध्ये पारंपरिकतेचा साज
रश्मिकाच्या वेडिंग आऊटफिटमध्ये पारंपरिकतेसोबत सांस्कृतिक संदर्भही जोडण्यात आले होते. तिच्या दुपट्ट्यावर हैदराबादच्या वास्तुकलेपासून प्रेरित टेंपल-हाऊस मोटिफ्सची भरतकाम करण्यात आली होती. लग्नाच्या दिवशी रश्मिका पारंपरिक साडी आणि दागिन्यांमध्ये अत्यंत देखणी दिसत होती. गळ्यात सोन्याचे जड हार, बाजूबंद, माथापट्टी आणि झुमके असा दागिन्यांचा साज होता. केसांमध्ये मोगऱ्याची फुले आणि कमीत कमी मेकअपमुळे तिचा लूक अधिक उठून दिसत होता.
विजयचा राजेशाही अंदाज
विजयच्या पोशाखातही पारंपरिकतेचा प्रभाव स्पष्ट दिसून येत होता. त्याने आयव्हरी रंगाच्या धोती सिव्हूटसोबत वर्मिलियन रंगाचा शेला परिधान केला होता. या पोशाखावर जंगल आणि मंदिरांपासून प्रेरित भरतकाम करण्यात आले होते. सोन्याचे लेयर्ड हार, बाजूबंद, कंबरबंध आणि इतर पारंपरिक दागिन्यांमुळे त्याचा लूक अधिक राजेशाही वाटत होता.
उदयपूरमध्ये रंगला शाही विवाहसोहळा
२६ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील उदयपूरपासून सुमारे २५ किमी लांब निसर्गरम्य अरावलीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या ITC Mementos रिझॉर्टमध्ये हा शाही लग्नसोहळा पार पडला. सकाळी तेलुगू पद्धतीने आणि संध्याकाळी रश्मिकाच्या कोडाव परंपरेनुसार विवाह करण्यात आला. ‘गीता गोविंदम’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेली दोघांची मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि अखेर त्यांनी लग्न करत आपल्या नात्याला अधिकृत रूप दिले.
त्यांच्या लग्नातील वेडिंग लूक आणि त्यामागची संकल्पना सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.