"तुमच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झाला..."; 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर रितेश देशमुख भावूक; अजितदादांना वाहिली श्रद्धांजली, Video

अभिनेता रितेश देशमुख याने ‘बिग बॉस मराठी ६’च्या मंचावर अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. मंचावर बोलताना रितेश देशमुख म्हणाला, "नमस्कार… २८ जानेवारीचा सूर्य सकाळ घेऊन येण्याऐवजी काळरात्र घेऊन आला. त्या एका बातमीने जो धक्का दिला, त्यातून मीच काय, अख्खा महाराष्ट्र...
"तुमच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झाला..."; 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर रितेश देशमुख भावूक; अजितदादांना वाहिली श्रद्धांजली, Video
"तुमच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झाला..."; 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर रितेश देशमुख भावूक; अजितदादांना वाहिली श्रद्धांजली, Video
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाम छाप उमटवणारे, सामान्य माणसासाठी काम करणारे आणि ‘कामाचा नेता’ म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे. ही बातमी केवळ राजकीय वर्तुळालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रासह सांस्कृतिक आणि मनोरंजनविश्वातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख याने 'बिग बॉस मराठी ६'च्या मंचावर अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. शनिवारी प्रसारित झालेल्या 'भाऊचा धक्का' या विशेष भागाच्या सुरुवातीलाच रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

'२८ जानेवारीचा दिवस काळरात्र घेऊन आला…'

मंचावर बोलताना रितेश देशमुख म्हणाला, "नमस्कार… २८ जानेवारीचा सूर्य सकाळ घेऊन येण्याऐवजी काळरात्र घेऊन आला. त्या एका बातमीने जो धक्का दिला, त्यातून मीच काय, अख्खा महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. ही घटना माझ्यासारख्या अनेक महाराष्ट्रप्रेमींना वेदना देणारी आहे."

रितेश पुढे म्हणाला की, अजित पवार हे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर महाराष्ट्राचे 'लाडके दादा' होते. "आपण सगळे त्यांना प्रेमाने आणि आदराने अजित दादा म्हणायचो. पण खरंतर हा बापमाणूस होता," असे म्हणत तो भावुक झाला.

'तुमच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झाला'

अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वावर बोलताना रितेश म्हणाला, "प्रिय दादा… आज इथे उभं राहून तुमच्याबद्दल बोलावं लागेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुमच्या शैलीने, नजरेच्या धाकाने समोरच्याला नि:शब्द करण्याची ताकद तुमच्यात होती. पण तुमच्या जाण्याने आज अख्खा महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे."

तो पुढे म्हणाला की, अजित पवार यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, माया आणि सामाजिक जाण यांचा संगम होता. "तुमचं रागावणं सुद्धा समोरच्याला कौतुकाची थाप वाटायची. अनेक वर्षे रखडलेली कामं तुमच्या एका आदेशावर मार्गी लागायची. म्हणूनच तुम्ही सामान्य माणसाच्या आयुष्यातील 'कामाचा माणूस" होतात,” असे तो म्हणाला.

'महाराष्ट्र धर्म पाळणारी बापमाणसं…'

रितेशने आपल्या भाषणात महाराष्ट्राने वेळेआधीच गमावलेल्या अनेक नेत्यांची आठवण काढली.
"माननीय विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, आर. आर. पाटील साहेब, प्रमोद महाजन आणि आता तुम्ही… तुम्ही सगळ्यांनी एकच धर्म पाळला, तो म्हणजे महाराष्ट्र धर्म. म्हणूनच आज महाराष्ट्रातील प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत," असे म्हणत त्याने अजित पवारांना आदरांजली वाहिली.

सोशल मीडियावरही श्रद्धांजली

या कार्यक्रमाचा व्हिडिओ रितेश देशमुखने सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, "तुमच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली. तुमची आठवण आणि कर्तृत्व आमच्या हृदयात सदैव जिवंत राहील, दादा."

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली असून, ३१ जानेवारी रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in