
सध्या 'बिग बॉस १९' ची सर्वत्र चर्चा आहे. अशातच रविवार (दि. १२) चा बिग बॉसचा एपिसोड चर्चेत आहे. कारण पहिल्यांदाच बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हा गायक अरिजीत सिंगसोबत झालेल्या वादाबाबत व्यक्त झाला आहे. सलमान आणि अरिजित यांच्यातील मतभेद हे बॉलीवूडमधील सर्वात चर्चित सेलिब्रिटी वादांपैकी एक आहेत. मात्र, आता अनेक वर्षांनी सलमानने याबद्दल उघडपणे भाष्य केले.
माझ्याकडून गैरसमज झाला - सलमान
रविवारी ‘बिग बॉस १९’ मधील ‘वीकेंड का वार’मध्ये कॉमेडियन रवी गुप्ताने हजेरी लावली होती. यावेळी रवी सलमानला गंमतीत म्हणाला, "मला तुमच्याकडे यायला भीती वाटत होती. कारण, मी अरिजीतसारखा दिसतो." त्यावर सलमानने हसत सांगितले की, "आता मी आणि अरिजित खूप चांगले मित्र आहोत."
"आमच्यात गैरसमज झाले होते आणि ते माझ्याकडून झाले होते. त्यानंतर त्याने माझ्यासाठी गाणी देखील गायली आहेत. 'टायगर ३' चित्रपटामध्ये त्याने गाणं गायलं, आणि आता 'बॅटल ऑफ गलवान'मध्येही तो गाणं गात आहे," असेही सलमानने पुढे स्पष्ट केले.
वादाची सुरुवात
'फ्री प्रेस जर्नल'ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान आणि अरिजीत यांच्यातील वादाची सुरुवात २०१४ मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात झाली होती. त्यावेळी सलमान सोहळ्याचं सूत्रसंचालन करत होता आणि अरिजीत 'आशिकी २'मधील 'तुम ही हो' या गाण्यासाठी पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आला. त्यावेळी अरिजीत साध्या कपड्यांमध्ये असल्याने सलमानने मस्करीत त्याला विचारलं, "तू झोपेत होतास का?" त्यावर अरिजीतनं हसत उत्तर दिलं, "तुम्ही लोकांनी मला झोपवलेलं." त्याचं हे बोलणं सलमानला फारसं आवडलं नाही.
सलमानने नाकारली अरिजीतची गाणी
या वादानंतर सलमानच्या काही चित्रपटांमधून अरिजीतची गाणी काढल्याच्या चर्चा होत्या. २०१६ मध्ये आलेल्या सलमानच्या सुलतान चित्रपटासाठी सुरुवातीला अरिजीत सिंगने 'जग घुमेया' हे गाणं रेकॉर्ड केलं होतं. पण, नंतर हे गाणं राहत फतेह अली खान यांच्या आवाजात रेकॉर्ड करून चित्रपटात ठेवण्यात आलं. त्यानंतर अरिजीतने फेसबुकवर पोस्ट करून सलमान खानची माफी मागितली. त्यात त्याने लिहिले होते, "कृपया माझं गाणं चित्रपटातून काढू नका. मी हे गाणं तुमचं व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन गायलं आहे." ही पोस्ट नंतर त्याने डिलीट केली, पण डिलीट करण्यापूर्वीच ती पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती.
तरी सलमानने अलीकडेच केलेल्या या खुलाश्यानंतर स्पष्ट झालं की, सलमान आणि अरिजीत यांच्यातील जुना गैरसमज मिटून आता दोघेही एकमेकांचे मित्र आहेत.