'पिंजऱ्याची चंद्रा’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन

'पिंजऱ्याची चंद्रा’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या मोहक व्यक्तिमत्त्वाने आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने अविस्मरणीय ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम (Sandhya Shantaram) यांचे निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीत एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Published on

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या मोहक व्यक्तिमत्त्वाने आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने अविस्मरणीय ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम (Sandhya Shantaram) यांचे निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीत एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

पिंजऱ्यातील मनमोहक भूमिका अजरामर

१९७२ साली प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या 'पिंजरा' या मराठी सिनेमात संध्यांनी साकारलेली 'चंद्रा' ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. त्या भूमिकेने संध्यांना मराठी सिनेइतिहासात एक वेगळी ओळख दिली. त्यांच्या भावपूर्ण नृत्य, मोहक हावभाव आणि सशक्त अभिनयाने त्यांनी ‘पिंजरा’ला अमरत्व बहाल केले.

विजया देशमुख ते संध्या शांताराम

संध्या यांचे मूळ नाव विजया देशमुख असे होते. त्यांनी १९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नवरंग’ या चित्रपटातून मोठी झेप घेतली. 'अरे जा रे हट नटखट' या प्रसिद्ध गाण्यात त्यांनी आपल्या नृत्यकलेची जादू दाखवली. या गाण्यासाठी त्यांनी खास शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी कोणताही नृत्यदिग्दर्शक नसल्याने, गाण्यातील प्रत्येक स्टेप त्यांनी आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी स्वतः तयार केली होती. संध्या यांचा पहिला चित्रपट हा 'अमर भूपाळी' होता. जो व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केला होता. व्ही. शांताराम दिसायला देखने होते. इतर मुली त्यांच्यावर भाळत होत्या. पण, ते भाळले संध्या यांच्या अभिनय आणि नृत्यावर. त्यांचे आणि संध्या यांच्यात जवळीक वाढली. त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजल्यावर त्यांची दुसरी पत्नी जयश्री यांनी घटस्फोट दिला. अवघ्या एका महिन्यातच व्ही. शांताराम यांनी संध्या यांच्यासोबत नव्याने संसार थाटला. व्ही. शांताराम यांचे हे तिसरे लग्न होते.

धाडसी आणि समर्पित अभिनेत्री

‘नवरंग’च्या या गाण्याच्या चित्रीकरणावेळी शांताराम यांनी सेटवर खरे हत्ती आणि घोडे आणले होते. अशा परिस्थितीत नाचणे धोकादायक असतानाही, संध्या निर्भयपणे परफॉर्म करत राहिल्या. त्यांनी बॉडी डबल वापरण्यास नकार दिला आणि शूटिंगपूर्वी त्या प्राण्यांशी स्वतः मैत्री करून त्यांना केळी आणि नारळ खाऊ घातले, पाणी पाजले. त्यांच्या या समर्पणाने दिग्दर्शक व्ही. शांताराम भारावून गेले आणि त्यानंतर त्यांनी संध्यांना आपल्या अनेक चित्रपटांत कामाची संधी दिली.

अविस्मरणीय चित्रपट आणि भूमिका

संध्या यांनी ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘अमर भूपाळी’ आणि ‘पिंजरा’ या चित्रपटांमधून अभिनय आणि नृत्य या दोन्ही क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा चेहरा, हावभाव आणि नृत्यावरील प्रभुत्व यामुळे त्या भारतीय सिनेमातील क्लासिकल ब्युटी आणि आर्टिस्टिक परफेक्शनचे प्रतीक ठरल्या.

त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. चित्रपटसृष्टीतील जाणकारांनी म्हटलं आहे की, “संध्या शांताराम म्हणजे रंग, नृत्य आणि अभिनय यांचं अप्रतिम मिश्रण होतं. त्या गेल्यानं भारतीय चित्रपटसृष्टीत एक युग संपलं.”

logo
marathi.freepressjournal.in