

चार दशकांहून अधिक काळ आपल्या अप्रतिम अभिनय आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे आज (दि. २५) निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. उपचारासाठी त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज दुपारी अडीजच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांनी दिली असून अंत्यसंस्कार उद्या (दि. २६) पार पडणार असल्याची माहिती आहे.
बहुगुणी कलाकाराची रंगतदार सफर
सतीश शाह हे हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शनच्या इतिहासातील एक अविस्मरणीय नाव मानले जाते. १९८३ साली आलेल्या कल्ट व्यंगचित्रपट ‘जाने भी दो यारो’ मधील त्यांच्या बहुप्रसिद्ध भूमिकांमुळे ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. त्यानंतर ‘हम साथ-साथ हैं’, ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’, ‘कभी हां कभी ना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि ‘ओम शांती ओम’ अशा असंख्य लोकप्रिय चित्रपटांत त्यांनी आपली अभिनयकौशल्ये दाखवली. हलक्याफुलक्या विनोदापासून ते सामाजिक संदर्भ असलेल्या व्यक्तिरेखांपर्यंत त्यांनी प्रत्येक भूमिकेत स्वतःचा ठसा उमटवला.
छोट्या पडद्यावरही गाजलेले नाव
फक्त चित्रपटच नव्हे, तर दूरदर्शनच्या सुवर्णकाळातही सतीश शहा हे एक घराघरात ओळखले जाणारे नाव ठरले. १९८० च्या दशकात प्रसारित झालेल्या ‘ये जो है जिंदगी’ या सिटकॉममधून त्यांनी दूरदर्शनवर पदार्पण केले आणि अल्पावधीतच लोकांची मने जिंकली. मात्र त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय भूमिका ठरली ती ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेतील इंद्रवदन साराभाई. त्यांच्या खास टायमिंग, विनोदबुद्धी आणि सहजतेने साकारलेल्या त्या व्यक्तिरेखेने आजही प्रेक्षकांच्या मनात आपली अढळ छाप ठेवली आहे.
मनोरंजनविश्वात शोककळा
सतीश शहा यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्दर्शक, सहकलाकार आणि चाहत्यांनी सामाजिक माध्यमांवरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रेक्षकांना हसवण्याबरोबरच विचार करायला लावणारा कलाकार म्हणून त्यांची ओळख होती.