बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आज (२ नोव्हेंबर) आपल्या साठावा वाढदिवसाचा साजरा करतोय. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही चाहत्यांनी मध्यरात्रीपासूनच 'मन्नत'बाहेर गर्दी केली. भारतीयच नव्हे, तर जगभरातून आलेल्या फॅन्सनी शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी उत्साहाने हजेरी लावली. चाहत्यांच्या या प्रेमाला उत्तर देत शाहरुखने त्यांना दिलंय एक भन्नाट सरप्राईज- त्याच्या पुढील सिनेमाचा 'किंग'चा पहिला प्रोमो!
सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये झळकतोय शाहरुखचा 'किंग'
या प्रोमोत शाहरुखचा एक वेगळाच ॲक्शन अवतार पाहायला मिळतोय. "किती खून केले, आठवत नाही! लोक चांगले होते का वाईट, माहित नाही! पण त्यांच्या डोळ्यात दिसलं की, त्यांचा हा अखेरचा श्वास आहे. आणि मी त्यामागचं कारण. जगाने मला एकच नाव दिलं ते म्हणजे किंग." अशा दमदार डायलॉगने प्रोमोची सुरुवात होते. तर शेवटी "डर नही, दहशत हू" असा शाहरुखचा थरारक डायलॉग फॅन्सना रोमांचित करतो. काहीच मिनिटांत या प्रोमोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला असून सोशल मीडियावर 'किंग' ट्रेंडिंगमध्ये झळकतोय.
'किंग'चं दिग्दर्शन ‘पठाण’ फेम सिद्धार्थ आनंदने केलं आहे. "शाहरुख खानचा नवीन अनुभव" अशा टॅगलाईनखाली या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप नेमकी रिलीज डेट जाहीर झालेली नाही.
या सिनेमात शाहरुखसोबत त्याची लेक सुहाना खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या अभिनयाची झलकही या प्रोमोत पाहायला मिळते. त्याचबरोबर अर्शद वारसी, जयदीप अहलावत आणि विशेष भूमिकेत दीपिका पादुकोणही झळकण्याची शक्यता आहे.
६०व्या वाढदिवशी चाहत्यांना दिलेलं हे गिफ्ट म्हणजे शाहरुखच्या स्टाईलमध्ये भन्नाट सरप्राईजच म्हणावं! आता 'किंग'च्या पूर्ण ट्रेलर आणि सिनेमाच्या रिलीजची सर्वांनाच उत्सुकतेने प्रतीक्षा आहे.