बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान वयाच्या ५९ व्या वर्षीही लीड हिरो म्हणून पडद्यावर झळकतो. ॲक्शन सीन असो किंवा रोमान्स, किंग खान आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. मात्र अलीकडेच एका ट्रोलरने त्याला ॲक्टिंगमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. हा सल्ला ऐकून शाहरुखने देखील लगेचच त्या ट्रोलरला त्याच्याच स्टाईलमध्ये चोख प्रत्युत्तर दिलं.
शाहरुख खानचा ट्रोलला करारा जवाब
१६ ऑगस्टला शाहरुखने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर Ask SRK सेशन केलं. यावेळी एका फॅनने लिहिलं - “भाई, आता तुमचं वय झालंय, रिटायरमेंट घ्या. दुसऱ्या मुलांनाही आता पुढे येऊ द्या.” असं म्हणत शाहरुखला रिटायरमेंटचा सल्ला दिला. त्याच्या या सल्ल्यावर शाहरुखने देखील त्याच्याच स्टाईलमध्ये दमदार उत्तर देत लिहिले की, “भाई, तुझ्या प्रश्नांमधला बालिशपणा संपला की काहीतरी चांगल विचार. तोपर्यंत तू टेम्परेरी रिटायरमेंटमध्ये रहा.”
याच दरम्यान दुसऱ्या एका युजरने शाहरुखला विचारलं, “कोणत्या गोष्टीचा त्रास जास्त होतो... जिममध्ये झालेल्या दुखापतीचा की ट्विटरवरील ट्रोल वाचण्याचा? यावर देखील शांतपणे प्रतिक्रिया देत अभिनेत्याने लिहिले की, “डम्बल आणि ॲक्शन माझी हाडे मोडू शकतात, पण असे ट्रोल करणारे शब्द मला कधीच दुखावू शकत नाहीत. मी माझ्या मनाची गाणी ऐकण्यात व्यस्त आहे यार."
शाहरुखच्या या उत्तरांवर त्याचे चाहते अक्षरशः फिदा झाले. त्याने दिलेल्या विनोदी स्टाईलमधील आणि शांत प्रत्युत्तरांनी ट्रोलर्सची चांगलीच बोलती बंद केली आहे.
आगामी काळात शाहरुख सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ चित्रपटात, मुलगी सुहाना खानसोबत दिसणार आहे. तसेच त्याचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असलेल्या वेब सिरीज ‘बास्टर्ड्स ऑफ बॉलीवूड’मध्येही तो झळकणार आहे.