बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. भरतपूर जिल्ह्यात दोषपूर्ण ह्युंदाई कारच्या विक्रीप्रकरणी दाखल झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीवरून या दोघांविरुद्ध FIR दाखल झाला होता. मात्र, उच्च न्यायालयाने या प्रकरणातील चौकशीवर स्थगिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?
भरतपूरमधील किर्ती सिंहने जून २०२२ मध्ये अधिकृत डीलरशिपमधून ह्युंदाई अल्काझार ही कार जवळपास २४ लाख रुपयांना खरेदी केली होती. काही काळानंतर कारमध्ये वारंवार तांत्रिक आणि उत्पादनाशी संबंधित समस्या निर्माण झाल्या. कंपनीकडे बदली किंवा परतफेडीची मागणी करूनही किर्तीला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिने न्यायालयात धाव घेतली.
स्थानिक दंडाधिकारी न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत फसवणुकीचा आरोप दाखल करण्याचे आदेश दिले. यानुसार ह्युंदाई मोटर इंडियाचे एमडी उन्सू किम, सीओओ तरुण गर्ग, संबंधित डीलरशिप मालक यांच्यासह ब्रँड ॲम्बेसेडर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यावरही FIR नोंदवण्यात आला.
शाहरुख-दीपिकाचा थेट संबंध नाही
या प्रकरणी शाहरुख आणि दीपिकाने राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीवेळी त्यांच्या वकिलांनी कारच्या विक्री किंवा उत्पादनातील समस्यांचा आणि त्यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, केवळ ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जाहिरातीत दिसल्यामुळे त्यांना आरोपी करण्यात आले, असा युक्तिवाद केला.
शाहरुख खानच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी तर दीपिका पदुकोणच्या वतीने माधव मित्रा यांनी बाजू मांडली. सिब्बल म्हणाले, “उत्पादनाचे प्रमोशन करणे म्हणजे त्याच्या गुणवत्ता मानकांची जबाबदारी घेणे नव्हे.” तर, मित्रा यांनी दीपिकाची कारच्या उत्पादन वा क्वालिटी कंट्रोलमध्ये कोणतीही भूमिका नसल्याचे अधोरेखित केले.
मध्यस्थीचा मार्ग शोधावा
न्यायमूर्ती सुदेश बन्सल यांनी सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर शाहरुख आणि दीपिकाच्या FIR ला स्थगिती दिली. तर, न्यायालयाने वाद सोडवण्यासाठी पक्षकारांनी मध्यस्थीचा मार्ग शोधावा, असेही स्पष्ट केले.