मानधन थकवल्यामुळे मराठी अभिनेता शशांक केतकर निर्माता-दिग्दर्शक मंदार देवस्थळीवर चांगलाच भडकला असून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. यासंबंधी त्याने एक व्हिडिओ पोस्ट करून आरोप केलेत आणि दोघांमधील संभाषणाचे काही स्क्रीनशॉट्सही जोडले आहेत.
दोन दिवसांपूर्वी शशांकने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती, ज्यात कोणाचंही नाव न घेता मालिका संपूनही मानधन न दिल्याचा आरोप केला होता. आता त्याने निर्माता मंदार देवस्थळी याचं थेट नाव घेत आरोप केले असून सोबत व्हॉट्सॲप चॅट्सचे स्क्रीनशॉट्सही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
५ लाख थकवले
२०१८ ते २०२० या कालावधीत कलर्स मराठीवर प्रसारित झालेल्या 'सुखांच्या सरींनी… हे मन बावरे' या लोकप्रिय मालिकेचं मानधन आजही पूर्णपणे मिळालेलं नसल्याचा आरोप शशांकने केला आहे. पाच लाख रुपये थकवल्याचं त्याचं म्हणणं आहे. मालिका संपून अनेक वर्षे झाली, तरी निर्मात्याकडून अजूनही पैसे मिळालेले नाहीत, असा दावा शशांक आणि मालिकेतील इतर कलाकारांनी याआधीही केला होता. त्यावेळी आवाज उठवल्यानंतर मानधन देण्याचं आश्वासन देण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात ते पूर्ण झालं नाही.
एक दिवसआधी दिला होता इशारा
४ जानेवारी २०२६ रोजी शशांकने प्रकरणावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. कोणाचंही नाव न घेता एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत त्याने, "निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय" अशा शब्दांत तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यावेळी संबंधित निर्मात्याकडून ५ जानेवारीला पैसे देण्याचं आश्वासन मिळाल्याचंही शशांकने सांगितलं होतं. ५ जानेवारीपर्यंत पूर्ण पेमेंट न झाल्यास सविस्तर व्हिडिओ पोस्ट करणार असल्याचाही इशारा त्याने दिला होता.
५ जानेवारी उजाडूनही पैसे न मिळाल्याने शशांकने अखेर सोशल मीडियावर थेट पाऊल उचललं. त्याने निर्माता मंदार देवस्थळी यांचं नाव घेत एक लांबलचक पोस्ट, व्हिडिओ आणि दोघांमधील व्हॉट्सॲप चॅट्सचे स्क्रिनशॉट शेअर केले. व्हिडिओमध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना, "अभिनय हा माझा व्यवसाय आहे. दिलेल्या कामाचं मानधन मागणं ही भीक नाही," असं तो ठामपणे म्हणाला. सोबत शेअर केलेल्या या चॅट्समध्ये ऑक्टोबर २०२५ पासून सुरू असलेला संवाद स्पष्टपणे दिसतो. शशांक वारंवार थकबाकीबाबत विचारणा करताना दिसतो, तर समोरून "लवकर पैसे देतो", "हातात काही नाही", "उद्ध्वस्त होईन" अशा शब्दांत आश्वासनं आणि विनवण्या केल्या जात असल्याचंही या संभाषणांतून समोर येतं.
टीडीएस सरकारकडे जमा न केल्याचा गंभीर आरोप
शशांकच्या म्हणण्यानुसार जवळपास ५ लाख रुपयांची रक्कम अजूनही बाकी आहे. मुद्दल रक्कम कशीबशी मिळाली असली, तरी कापलेला टीडीएस सरकारकडे जमा न केल्याचा गंभीर आरोपही त्याने केला आहे. म्हणजेच कलाकारांचे पैसे अडवण्यासोबतच कायदेशीर नियमांचाही भंग झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. ही परिस्थिती केवळ स्वतःपुरती मर्यादित नसून अनेक कलाकारांची असल्याचंही शशांकने नमूद केलं, मात्र सध्या तो स्वतःच्या लढ्याबाबतच बोलत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
'सगळे निर्माते असे नसतात'
या पोस्टमध्ये शशांकने हेही ठामपणे स्पष्ट केलं की इंडस्ट्रीतील सगळेच निर्माते असे नसतात. अनेक प्रामाणिक आणि वेळेत मानधन देणारे निर्माते आहेत. मात्र हा लढा फक्त आणि फक्त ‘हे मन बावरे’ मालिकेचे निर्माता मंदार देवस्थळी यांच्याविरोधात आहे. पैशांचा विषय निघाला की गयावया करणे, भावनिक ब्लॅकमेल करणे आणि कलाकारांना मूर्ख ठरवणे, असा आरोपही त्याने केला आहे.
इतर कलाकारांचा पाठिंबा, कायदेशीर कारवाईचे संकेत
शशांकच्या या भूमिकेनंतर मालिकेतील तसेच इंडस्ट्रीतील इतर कलाकारांनीही त्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत "वेळेत मानधन मिळणं हा कलाकारांचा हक्क आहे" अशी ठाम भूमिका मांडली आहे. दरम्यान, शशांकने पुढील सविस्तर व्हिडिओमध्ये सर्व कायदेशीर तपशील मांडणार असल्याचं सूचित केलं आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ सोशल मीडियापुरतं न राहता पुढे कायदेशीर वळण घेणार का, याकडे संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.