Red Soil Stories : यूट्यूबर शिरीष गवसचे निधन; कोकणातील खाद्यसंस्कृती घरोघरी पोहोचवणारा खवय्या हरपला

‘Red Soil Stories’ या लोकप्रिय मराठी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक जीवनशैली, खाद्यसंस्कृती आणि मातीशी असलेलं नातं जगासमोर मांडणारे शिरीष गवसचे १ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले.
Red Soil Stories : यूट्यूबर शिरीष गवसचे निधन; कोकणातील खाद्यसंस्कृती घरोघरी पोहोचवणारा खवय्या हरपला
Published on

‘Red Soil Stories’ या लोकप्रिय मराठी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक जीवनशैली, खाद्यसंस्कृती आणि मातीशी असलेलं नातं जगासमोर मांडणारे शिरीष गवसचे १ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. वयाच्या केवळ ३३ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. ‘Red Soil Stories’ च्या माध्यमातून शिरीष आणि पूजा घरोघरी पोहचले होते. शिरीषच्या अचानक निधनाने कोकणात शोककळा पसरली आहे.

शिरीष गवस गेल्या काही दिवसांपासून मेंदूशी संबंधित आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर गोव्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्राथमिक माहितीनुसार, त्याला ब्रेन हॅमरेजचा त्रास होता. उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला.

आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाट्ये पुनर्वसन परिसरात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबईहून कोकणात परतलेलं हे प्रेरणादायी जोडपं

कोरोना काळात जेव्हा सर्व जग थांबले होते, त्याच काळात शिरीष आणि त्याची पत्नी पूजा गवस यांनी मुंबईतील आपलं सुखवस्तू आयुष्य मागे टाकत सिंधुदुर्गात परतण्याचा धाडसी निर्णय घेतला. शिरीष मुंबईत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता, तर पूजा ही जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि FTII मधून शिक्षण घेऊन बॉलिवूडमध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत होती.

कोकणात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावातलं साधं, मातीच्या सुगंधाने भरलेलं आयुष्य युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. ‘Red Soil Stories’ या त्यांच्या चॅनेलने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. आज या चॅनेलचे ४.२७ लाख सबस्क्रायबर्स असून, १६१ हून अधिक व्हिडिओज त्यांनी तयार केले आहेत.

कोकणातील मातीच्या कहाण्या जगासमोर

शिरीषने कोकणातील पारंपरिक जेवण, शेती, जंगलातील जीवन, सण-उत्सव, स्थानिक लोकांच्या आठवणी आणि त्यांच्या जीवनशैलीला सुंदरपणे जगासमोर मांडली. या दाम्पत्यांनी भातशेती केली, पारंपरिक पद्धतीने शिजवलेलं जेवण आणि गावातील वयोवृद्धांची आठवणीतली कोकणकथा लोकांपर्यंत पोहोचवल्या. यासाठी त्यांना पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.

केवळ वर्षभरापूर्वीच त्यांच्या घरी एका गोंडस मुलीचं आगमन झालं होतं. काही दिवसांपूर्वीच तिचा पहिला वाढदिवस त्यांनी ‘Red Soil Stories’ च्या माध्यमातून साजरा केला होता. आता त्याच व्हिडिओखाली त्यांचे चाहते दुःख व्यक्त करत, भावनिक श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

शिरीष गवसचे अचानक जाणे हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर कोकणप्रेमी आणि युट्यूबवरील त्यांच्या प्रेक्षकांसाठीही मोठी शोकांतिका आहे.

logo
marathi.freepressjournal.in