श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर नारायणगावकर कुटुंबीयांची नाराजी; चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाच्या शीर्षकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाचे नाव बदलून 'विठा' किंवा 'विठाबाई' ठेवण्याची मागणी केली आहे.
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर नारायणगावकर कुटुंबीयांची नाराजी; चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर नारायणगावकर कुटुंबीयांची नाराजी; चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी
Published on

अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला आणि तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित 'ईठा' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विठाबाईंच्या भूमिकेतील श्रद्धा कपूरचा लूक आणि अभिनयाची झलकही चाहत्यांच्या पसंतीस उतरली. मात्र, या सकारात्मक चर्चेदरम्यानच चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी निर्मात्यांकडे नाव बदलण्याची मागणी केली आहे.

विठाबाई यांचे पुत्र कैलास नारायणगावकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, या चित्रपटाची माहिती त्यांना अवघ्या आठवडाभरापूर्वीच मिळाली. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर आईचा संघर्ष मोठ्या पडद्यावर मांडला जात असल्याचा आनंद वाटला. मात्र, चित्रपटाची निर्मिती करताना कुटुंबाशी संपर्क साधला असता तर, विठाबाईंच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे पैलू आणि वैयक्तिक माहिती देता आली असती, त्यामुळे चित्रपटाला अधिक वास्तवाची जोड मिळाली असती, असे त्यांनी म्हटले.

'ईठा'ऐवजी 'विठा' किंवा 'विठाबाई' नावाची मागणी

ग्रामीण भागात 'विठा'चा उच्चार 'ईठा' असा केला जातो, हे मान्य असले तरी विठाबाईंचे मूळ नावच चित्रपटाच्या शीर्षकात असावे, अशी कुटुंबीयांची भूमिका आहे. आजच्या पिढीला त्यांची खरी ओळख त्यांच्या नावातूनच व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

निर्मात्यांना मेलद्वारे सूचना

विठाबाई यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी निर्मात्यांकडे चित्रपटाचे नाव 'विठा' किंवा 'विठाबाई' करावे आणि त्यासोबत 'नारायणगावकर' हे आडनावही उपशीर्षकात समाविष्ट करावे, अशी सूचना मेलद्वारे पाठविल्याचे सांगितले. तसेच, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो कुटुंबीयांना दाखवावा, जेणेकरून आक्षेपार्ह काही असल्यास त्याबाबत चर्चा करता येईल, अशीही मागणी त्यांनी केली.

संपर्क न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

कुटुंबीयांचा चित्रपटाच्या निर्मितीला विरोध नसून केवळ शीर्षकाबाबत आक्षेप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, २ ते ३ जुलैपर्यंत निर्मात्यांनी संपर्क साधला नाही, तर कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला जाईल, असा इशाराही मोहित नारायणगावकर यांनी दिला. उच्च न्यायालयातील वकिलांशी याबाबत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या मागणीवर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, अभिनेत्री श्रद्धा कपूर किंवा मॅडॉक फिल्म्स यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in