‘धडक २’ या चित्रपटात 'निलेश' ही भूमिका गाजवणारा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सध्या चर्चेत आला आहे. त्याने केलेल्या एका कृतीमुळे प्रेक्षकांच्या मनात त्याने जागा मिळवली आहे. सिद्धांतला पुरस्कार मिळाल्यावर त्याने मंचावरून जो निर्णय जाहीर केला, त्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते.
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी ‘Power Packed Performer of the Year’ हा प्रतिष्ठित पुरस्कार अलीकडेच प्रदान करण्यात आला. मात्र हा सन्मान स्वीकारताना सिद्धांतने हा पुरस्कार दिवंगत सक्षम ताटे याला समर्पित केला. जातीय द्वेषातून बळी गेलेल्या एका तरुणाच्या नावाने पुरस्कार देत सिद्धांतने मानवतेचा मोठा संदेश दिला.
मंचावरून बोलताना तो म्हणाला, “हा पुरस्कार फक्त माझा नाही. जातीय भेदभावाच्या छायेतही जगण्याचा संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जिद्दीचा सन्मान आहे. त्यामुळे हा सन्मान मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतो. त्याच्या मागे त्याचं कुटुंब, त्याचे गाव आणि आज माझं मन उभं आहे.”
सिद्धांतच्या या भावनिक प्रतिक्रियेनंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सिद्धांतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांकडून त्याच्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे. सिद्धांत चतुर्वेदीचा हा आवाज केवळ एका कलाकाराचे मत राहिले नसून, देशभरात जातीयतेविरुद्धचा मानवी संदेश म्हणून पोहोचत आहे.
सक्षम ताटे नेमका कोण?
नांदेडमध्ये २७ नोव्हेंबर रोजी २० वर्षीय सक्षम ताटे याची निर्घृण हत्या झाली होती. ३ वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या या तरुणावर मुलीच्या कुटुंबीयांनी गोळीबार करून फरशीने वार करत त्याचा जीव घेतला. या प्रकरणात आतापर्यंत ८ आरोपी अटकेत असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सरकारकडून सक्षम ताटेच्या कुटुंबाला दिलासा
या घटनेनंतर पीडित कुटुंबाला समाज कल्याण विभागाकडून ८.२५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी ४.१२ लाख रुपये पहिला टप्पा म्हणून देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम चार्जशीट दाखल झाल्यानंतर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.